
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. यावर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे गटावर तिखट प्रत्युत्तर दिले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे जणू काही जादूची कांडी. आजकाल ही कांडी सगळीकडे फिरतेय. कधी कोणी एआयने गाणं बनवतं, कधी चित्र काढतं, तर कधी थेट भविष्य वर्तवायला लागतं. पण हा एआय आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात घुसलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तर एआयचा वापर करून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज जिवंत करत थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. पण हा हल्ला ऐकून भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले आहेत. ते म्हणाले, बाळासाहेब असते तर लाथच मारली असती.

शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमधील निर्धार मेळाव्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण सादर केलं. या भाषणात बाळासाहेबांच्या खणखणीत आवाजात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. ही काही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाईचं ढोंग आहे. भाजपला महाराष्ट्रात आम्हीच वाढवलं. पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. आमचं 25 वर्षांचं नातं होतं, हिंदुत्वाचं. मग नातं तोडलं कुणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत, हळूहळू काढतो. नाहीतर एकदम खेळ आटोपून जाईल, असं एआय भाषणात सांगण्यात आलं.
राजकीय तणाव वाढला
एआयचा हा खेळ भाजपला अजिबात आवडला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांचा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह केला आहे. त्यांचं आयुष्य ज्या विचारांविरोधात गेलं, त्या विचारांच्या बाजूने ठाकरे गट उभा आहे. आज बाळासाहेब असते तर अशा पोरकटपणाला लाथच मारली असती, असं बावनकुळे म्हणाले. ज्यांनी वीर सावरकरांचा अपमान केला, राहुल गांधींच्या गळ्यात गळे घातले, राममंदिराचा विरोध केला, वक्फच्या विरोधात मतदान केलं, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून ठाकरे गट बसलाय.
मराठी माणसांच्या घरात घोटाळे करून गल्ले भरले. बाळासाहेबांनी यांच्या बुडावर लाथ घातली असती, असा घणाघात बावनकुळेंनी केला. बावनकुळे थांबले नाहीत. त्यांनी ठाकरे गटाला उद्देशून सांगितलं, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या गोष्टींसाठी लढा दिला, त्या विरोधात त्यांचा आवाज वापरू नका. त्यांचे विचार तुम्ही बुडवलेत, तरी किमान त्यांच्या आवाजाचा गैरवापर करू नका. बावनकुळेंच्या या टीकेने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना नेते महायुतीत
गेल्या काही दिवसांत अनेक शिवसैनिक शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा एआयचा प्रयोग ठाकरे गटासाठी एक नवा डाव ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला काही नवीन नाही. पण एआयचा वापर करून राजकीय हल्लाबोल करणं, हे मात्र नक्कीच नवं आहे. ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या आवाजात भाजपला लक्ष्य केलं, तर भाजपनेही सडेतोड उत्तर देत हा प्रकार पोरकटपणा असल्याचं म्हटलं. आता प्रश्न असा आहे, की एआयचा हा ट्रेंड राजकारणात कायम राहणार का? की हा फक्त एका मेळाव्यापुरता स्टंट होता? एक गोष्ट मात्र नक्की, एआयने राजकारणाला एक नवा रंग दिलाय. पण हा रंग किती काळ टिकेल, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत, बाळासाहेबांच्या लाथेचा इशारा आणि एआयचा तडका यांची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगणार आहे.