महाराष्ट्र

MSRTC : शिवशाहीचा सूर्य मावळला, हिरकणीच्या पहाटेची नवी किरणे 

Maharashtra : गेल्या काही वर्षांत वाढलेल्या बिघाडीमुळे घेतला परिवर्तनाचा निर्णय

Author

 शिवशाही बसगाड्यांच्या वाढत्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांचा संयम सुटू लागला होता. त्यामुळे आता एसटी महामंडळाने शिवशाहीला निरोप देत ‘हिरकणी’ या नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नागपूर विभागातील प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवाशांच्या सतत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात सुरू असलेल्या शिवशाही बसगाड्यांचे टप्प्याटप्प्याने रूपांतर ‘हिरकणी’ या नव्या निमआराम बस सेवेमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच नागपूर विभागात शिवशाहीचा प्रवास थांबणार आहेत. हिरकणीच्या नव्या सोयीसुविधांनी सजलेल्या बसगाड्यांची वाटचाल सुरू होणार आहे.

2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या शिवशाही बससेवेचा उद्देश प्रवाशांना एसीद्वारे आरामदायी प्रवास देण्याचा होता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये या बसगाड्यांबाबत तांत्रिक बिघाड, देखभालातील त्रुटी, खराब सीट्स, आणि अपुर्‍या सुविधा यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली होती. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला असून, शिवशाही बसची जागा हिरकणी बस घेणार आहे. हिरकणी बसगाड्या ही निमआराम विना-एसी सुविधा असलेल्या परंतु आधुनिक आणि प्रवाशांसाठी अनुकूल अशा बस असतील. बसच्या रंगसंगतीपासून अंतर्गत रचनेपर्यंत सर्वच बाबतीत हिरकणी बस एक वेगळा अनुभव देणार आहे. गणेशपेठ येथील मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये या बसगाड्यांचे बदलाचे काम वेगात सुरू आहे, असे विभागीय अधिकारी श्रीकांत गभणे यांनी स्पष्ट केले.

Yashomati Thakur : फॉक्सकॉन प्रकल्पाचा घास हातातून हिसकावला

आधुनिक रचना

हिरकणी बसमध्ये प्रवाशांच्या सोयीचा विशेष विचार करण्यात आला आहे. बदललेल्या रचनेत ‘दोन बाय दोन’ सीट्स बसवण्यात येणार आहे. प्रत्येक सीट रिक्लायनर प्रकारात असेल. खिडक्यांवर काचेची तावदाने बसवली जातील तसेच प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट्सही असतील. बसमध्ये एकूण 45 प्रवाशांच्या आसनक्षमता असेल. या बसगाड्यांचे इंजिन आणि चॅसी मात्र मूळच राहणार आहेत. बॉडी आणि अंतर्गत सुविधा यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे ही बस अधिक कार्यक्षम आणि प्रवाशांना आकर्षक ठरणार आहे. या नव्या स्वरूपातील बसगाड्यांची देखभाल अधिक प्रभावी पद्धतीने केली जाणार आहे.

टप्प्याटप्प्याने होणार रूपांतर

सध्या एमएसआरटीसीच्या ताफ्यात एकूण 886 बसगाड्या आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच शिवशाही बसगाड्यांचे रूपांतर हिरकणीत करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील सर्व आगारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही काळ शिवशाही बस सेवा सुरू राहील. मात्र लवकरच एसटीमधून शिवशाहीचा प्रवास इतिहासजमा होणार आहे.

Ashish Jaiswal : राज्यभर वाळू माफियांचा दबदबा

शिवशाहीच्या जागी हिरकणी ही नवी संकल्पना प्रवाशांना नव्या प्रवासाचा अनुभव देणार आहे. एसटी महामंडळाचा हा निर्णय केवळ तांत्रिक दृष्टिकोनातून नव्हे, तर प्रवाशांच्या गरजा आणि समाधान लक्षात घेऊन घेतलेला आहे. नागपूर विभागासह राज्यभरातील प्रवासी आता ‘हिरकणी’च्या नव्या प्रवासासाठी सज्ज होत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!