
श्रीकर परदेशी यांच्या नेतृत्वात सरकारी कार्यालयांची गुणवत्ता सुधारण्याची शंभर दिवसांची मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेने प्रशासनात कार्यक्षमता आणि गती वाढवण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केला आहे.
सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी टीका झेलणाऱ्या व्यवस्थेने आता स्वतःवर सुधारण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी राबविलेली शंभर दिवसांची गुणवत्ता मोहिम आता राज्यभरातील प्रशासकीय व्यवस्थेला खडबडून जागवत आहे. प्रत्येक कार्यालयाला गुणांकनाच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये फक्त उपस्थिती नव्हे तर दर्जा, गती आणि जनतेशी असलेला संवाद तपासला जात आहे.

गुणवत्ता मोहीम म्हणजे केवळ कार्यालयीन स्वच्छता किंवा फलकांवरची घोषणाच नाही. तर प्रत्यक्ष कृती आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा आभ्यास आहे. श्रीकर परदेशी यांच्या दृष्टीकोनात स्पष्टता, शिस्त आणि कार्यक्षमतेचा आग्रह दिसून येतो. त्यांचा हा उपक्रम म्हणजे संथ गतीने चालणाऱ्या प्रशासनाला एक सकारात्मक धक्का देणारा यशस्वी प्रयोग ठरत आहे.
Harshwardhan Sapkal : जातीयवादाच्या विरोधात काँग्रेसचा सद्भावना सत्याग्रह
कामगिरीचा कसोटीपद्धतीने आढावा
गुणवत्ता मोहिमेंतर्गत राज्यातील 12 हजार 500 शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ, स्वच्छता, तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सुविधा, अधिनस्त कार्यालयांना दिलेल्या भेटी, जनतेसाठी सुलभ सेवा अशा विविध मुद्द्यांवर गुणांकन होत आहे. प्रत्येक कार्यालयासाठी 100 गुणांची चौकट तयार करण्यात आली आहे. 40 गुणांचे लक्ष्य अनिवार्य करण्यात आले आहे. हे मूल्यांकन नियतपद्धतीने करण्यात येत आहे. अंतिम टप्प्यावर भारतीय गुणवत्ता परिषदेची छाननी होणार आहे.
प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याच्या कार्यशैलीत या प्रक्रियेमुळे शिस्तबद्धतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कार्यालयीन कामकाज सरकारी स्वरूपात न राहता अधिक उत्तरदायी बनवण्याचा हा श्रीकर परदेशी यांचा प्रयत्न आहे. त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत परिणामकारकतेचा आढावा घेतला. नागपूर विभागाच्या आढाव्यात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, संजय मीना, ए. श्रीलक्ष्मी, तेजुसिंग पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.
नागपूरचे योगदान ठळक
श्रीकर परदेशी यांनी या संपूर्ण प्रक्रियेला केवळ एका अहवालापुरते मर्यादित ठेवलेले नाही. तर प्रत्यक्ष परिवर्तन घडविण्याचा संकल्प केला आहे. कार्यालयीन संस्कृतीत पारदर्शकता, गतिशीलता आणि नागरिकाभिमुखता यांचा समावेश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ही मोहीम म्हणजे शासनाच्या प्रत्येक स्तराला जबाबदारीची जाणीव करून देणारा आरसा आहे.
श्रीकर परदेशी यांच्या नेतृत्वात ही गुणवत्ता मोहीम प्रशासनात चैतन्य फुंकणारी प्रक्रिया बनली आहे. आजवर फक्त कागदावर चालणाऱ्या सुधारणा आता व्यवहारात येऊ लागल्या आहेत. त्यांच्या स्पष्ट दृष्टिकोनामुळेच विभागीय कार्यालयांना नवा ऊर्जा मिळाल्याचे दिसून येत आहे. नागपूर विभागात या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी प्रत्येक तालुकास्तरावर याचे गांभीर्याने पालन सुनिश्चित केले आहे.
जलसंपदा, महसूल, वीज वितरण, जीवन प्राधिकरण अशा विविध विभागांनी आपापल्या कार्यपद्धतीत बदल करून नागरिकांना जलद सेवा देण्यावर भर दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे नागपूर विभाग प्रशासनाच्या सुधारणांच्या आघाडीवर आहे. श्रीकर परदेशी यांनी दाखविलेला कठोर पण सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रत्येक घटकाची कसोटी लावण्याची तयारी, हीच शासकीय प्रशासनाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरत आहे.