नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात 17 मार्चच्या दंगलीनंतर मोठा प्रशासनिक बदल झाला आहे. ठाणेदार संजय सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी कणखर अधिकारी शुभांगी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 मार्च रोजी उसळलेल्या दंगलीनंतर मोठे प्रशासनिक बदल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या रोषाचा परिणाम ठाणेदार संजय सिंग यांना सहन करावा लागला व त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता गुन्हे शाखेतील निरीक्षक शुभांगी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान देशमुख यांच्यासमोर असणार आहे. त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शुभांगी देशमुख यांना पोलिस दलातील अत्यंत सक्षम आणि निर्णायक अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे आधीही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राहिल्या आहेत. यावेळीही त्यांना कठीण परिस्थितीत काम करावे लागणार आहे.
Harshawardhan Sapkal : शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून सरकारचा गजनी अवतार
बदलीची मागणी पूर्ण
हिंसाचारानंतर हंसापुरी परिसरातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी ठाणेदार संजय सिंग यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी केली होती. या मागणीला जोर मिळाल्यानंतर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी देखील त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. परिणामी, प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत संजय सिंग यांची बदली केली व नवीन जबाबदारी शुभांगी देशमुख यांच्याकडे सोपविली.
हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी स्पष्ट केले आहे की, हिंसाचारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास मोहीम राबविली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया चॅट्स आणि अन्य डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. अनेक आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांना अटक केली जाणार आहे.
Sanjay Rathod : संघटनात्मक मजबुतीसाठी एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा
पोलीसांचा ठाम निर्धार
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, भविष्यात अशा प्रकारच्या हिंसाचारास कोणी प्रोत्साहन दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागपूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची तयारी केली आहे. पोलीस जनतेसाठी आहेत आणि फक्त गुन्हेगारांनीच त्यांना घाबरावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शुभांगी देशमुख यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन, अशांतता निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई केली जाईल. तहसील पोलीस ठाण्यातील नव्या बदलांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. येत्या काळात, शुभांगी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिसांची कार्यशैली अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.