
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांचा नागपुरात अपघात झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला आवाहन केले आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद नेहमीच समाजहिताच्या मुद्द्यांवर भाष्य करतात. यावेळीही त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि जीव वाचवणारा संदेश दिला आहे. नुकताच नागपूरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात त्यांची पत्नी सोनाली, भाचा आणि बहीण कारमध्ये होते. पण, सीट बेल्ट लावल्यामुळे ते सर्व सुरक्षित राहिले. हा प्रसंग आठवून सोनूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लोकांना सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन केले. सोनू सूद यांच्या या आवाहनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, प्रत्येक सीट महत्त्वाची आहे, प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. मागच्या सीट बेल्टसुद्धा जीव वाचवतात. तुमच्या प्रियजनांसाठी बकल बांधा, असे आवाहन त्यांनी केले. सोनू सूद यांनी हेही स्पष्ट केले की, अनेक जण केवळ पोलिसांपासून वाचण्यासाठी पुढच्या सीटवर सीट बेल्ट लावतात, पण मागच्या सीटवर बसणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. जो कोणी मागे बसतो आणि सीट बेल्ट लावत नाही, त्याने विचार करावा. त्याला त्याचे कुटुंब प्रिय आहे का? सुरक्षित प्रवास करा, सीट बेल्ट न विसरता. असे त्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले.
सुरक्षा महत्वाची
मागच्या आठवड्यात झालेल्या अपघातात गाडीची अवस्था अत्यंत भयंकर होती. पण, त्यांना वाचवणारे एकच कारण होते, सीट बेल्ट. असे त्यांनी सांगितले. कारमधील प्रवाशांनी, विशेषतः मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तींनीही सीट बेल्ट लावावा, यावर त्यांनी भर दिला आहे. सोनू सूद यांनी नमूद केले की, साधारणतः मागे बसलेले प्रवासी सीट बेल्ट लावत नाहीत. पण अपघात झाल्यास सीट बेल्टमुळेच जीव वाचू शकतो. या घटनेनंतर त्याने लोकांना आवाहन केले की, मागच्या सीटवर बसताना देखील सीट बेल्ट लावणे अनिवार्य करावे.
सोनू यांच्या पत्नीने अपघाताच्या दिवशी त्यांच्या नणंदेला सीट बेल्ट लावण्यास सांगितले होते. काही मिनिटांतच अपघात झाला, पण सीट बेल्टमुळे तिघीही बचावल्या. 100 पैकी 99 लोक मागच्या सीटवर सीट बेल्ट लावत नाहीत. त्यांना वाटते की हा फक्त पुढे बसलेल्या प्रवाशांसाठीच आहे, असे त्यांनी सांगितले. 24 मार्च रोजी रात्री मुंबई नागपूर महामार्गावर वर्धा रोडवर त्यांचा भीषण अपघात झालाहोता. ज्यात सोनाली, तिची बहीण आणि भाचा जखमी झाल्याचे समोर आले होते. सोनाली आणि त्यांच्या बहिणीवर नागपुरातील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते.