राज्याच्या स्वच्छतेमागील हातांना न्याय मिळवून देण्यासाठी आता संघर्षाच्या रणांगणात उतरले आहेत शेरसिंग ऊर्फ सतीश डागोर. कंत्राटी शोषणाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवत सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा निर्णायक एल्गार पुकारला आहे.
राज्य शासनाच्या विविध कार्यालयांत सुरू असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीला राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग ऊर्फ सतीश डागोर यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कंत्राटी पद्धतीविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली. शासनाच्या या धोरणामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
केवळ दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेले डागोर यांनी आपल्या कार्यकाळात निर्णायक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कंत्राटी पद्धती बंद करून कायमस्वरूपी पदांवर भरती करण्याची मागणी केली आहे. सफाई कामगारांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनुकंपा नियुक्त्यांमध्ये विलंब
राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये सफाई कामगारांच्या समस्यांवर आढावा बैठकांचे आयोजन सुरू आहे. त्यातून प्राप्त अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. या अहवालात बाह्यस्त्रोत व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागी स्थायी भरतीसाठी जोरदार शिफारस केली जाणार आहे. अनेक महापालिका व आरोग्य खात्यांतील अधिकाऱ्यांना सफाई कामगारांबाबतचे शासकीय नियम माहित नसल्याचे या बैठकीत समोर आले, हे चित्र अधिकच गंभीर आहे.
राज्यात सुमारे दोन हजार अनुकंपा व लाड-पागे संवर्गातील प्रकरणे प्रलंबित आहेत. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने नोकरी देण्यासाठी आयोगाकडून धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. नागपूर विभागातच पाचशे प्रकरणे प्रलंबित आहेत. केवळ आरोग्य विभागात 22 पदांवर नियुक्ती रखडल्या आहेत. सेवा समाप्तीनंतर 30 दिवसांत अनुकंपा नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही आठ वर्षे लोटूनही त्यात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही डागोर यांनी दिला.
कायमस्वरूपी हक्कांसाठी संघर्ष
नागपूर महापालिका हद्दीत 25 वर्षे सेवा दिलेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी उप्पलवाडी परिसरात 500 घरांच्या उभारणीसाठी डीपीआर तयार झाला आहे. लवकरच काम सुरू होणार आहे. ही योजना म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांच्या जगण्यात मोलाचा आधार ठरणार आहे.
डागोर यांनी स्पष्ट केले की, सफाई कर्मचाऱ्यांना केवळ रोजगार, तसेच सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळायला हवा. सेवेत 25 वर्ष पूर्ण केल्यावर निवृत्ती लाभ, अनुकंपा अधिकार, सुरक्षितता, घरे व आरोग्य सुविधा यासाठी नियमांची सक्त अंमलबजावणी करावी लागेल. हे नियम पाळले गेले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल.
राज्यभरातील सफाई कामगारांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी शेरसिंग ऊर्फ सतीश डागोर आक्रमक व निर्णायक भुमिकेत उतरले आहेत. त्यांच्या या लढ्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या वर्गाच्या हक्कांचा आवाज पुन्हा बुलंद होताना दिसत आहे.
