
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 16 एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात शांततेसाठी सद्भावना मार्च काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 16 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे, शहर आणि जिल्हा काँग्रेस समित्या उत्साहात आणि सज्जतेत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभरात जय्यत तयारी सुरू आहे. गुलाल, पोस्टर्स, आणि घोषणा यांचा जल्लोष असणार आहे. मात्र या स्वागतमूळे नुसता आनंद नाही, तर अनेक ज्वलंत प्रश्नही या दौऱ्याभोवती घुटमळत आहेत. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात्रेचा मूळ उद्देश शांतता निर्माण करण्याचा आहे.

सपकाळ यांच्या खांद्यावर पक्षाचे नेतृत्व करण्याबरोबरच, गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसच्या नवसंघटनाचेही आव्हान आहे. विशेषतः नागपूरसारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील शहरात, पक्षाची प्रतिमा आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणं ही एक मोठी जबाबदारी ठरणार आहे. अलीकडेच नागपूरमध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम तणावाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने शहरात सद्भावना शांती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या यात्रेचा उद्देश शहरात शांतता प्रस्थापित करणे आहे.
पोलिसांची कारवाई
समुदायांमधील गैरसमज दूर करणे आणि परस्पर सलोखा वाढवणे याचा मूळ उद्देश आहे. 17 मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून शहरात दंगल उसळली होती. आंदोलनाच्या दरम्यान एका समुदायाचे धार्मिक पुस्तक जाळल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर 25 मार्च रोजी पोलिसांनी 114 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आणि हिंसाचाराच्या विविध घटनांवर आधारित 13 गुन्हे दाखल केले. या संपूर्ण प्रकरणातील आरोपींच्या विरोधात पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानेही या प्रकरणात गुंतलेल्या आरोपींच्या घरांवरील बेकायदेशीर बांधकामे पाडली होती. यात युसूफ शेख आणि फहीम खान यांचा समावेश आहे. सपकाळ यांच्या दौऱ्यात, केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ही सद्भावना यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काँग्रेसचा नवा अध्याय नागपूरमधून सुरू होत आहे. या प्रवासात सलोख्याचा गंध दरवळायला लागलाय. मुस्लिम अध्यक्षाच्या संभाव्यतेवर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
वडेट्टीवारांचा सवाल
वडेट्टीवार यांनी सवाल केला की, काँग्रेसमधील मुस्लिम नेतृत्वावर प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावं. भाजप किंवा आरएसएस कधी त्यांच्या संघटनेचा मुस्लिम अध्यक्ष करतील का? या विधानामुळे राजकीय वर्तुळात एक नवा चर्चेचा विषय तयार झाला आहे. सपकाळ यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस एकीकडे सलोखा प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत असताना, दुसरीकडे विरोधकांवरही जोरदार टोले लगावतेय. सपकाळ यांचा नागपूर दौरा हा केवळ एक दौरा न राहता, काँग्रेससाठी एक नवसंघटनाचा, नवसंकल्पाचा आणि नवशक्तीचा प्रारंभ ठरेल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे.