महाराष्ट्र

Aditi Tatkare NCP : वैष्णवी साठी आता रडायचं नाही तर लढायचं 

Vaishnavi Hagwane : न्याय मिळेपर्यंत ही आग थांबणार नाही 

Author

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळवली असून, न्यायाच्या लढ्याला वेग आला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट हस्तक्षेप करत आरोपींना तात्काळ अटक आणि चौकशीच्या उणीवा दूर करण्याचा इशारा दिला आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ठाम आणि भावनिक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या, हगवणे कुटुंबीयांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अमानुष वेदना सहन केल्या आहेत. या प्रकरणात अजूनही जे काही मुद्दे, अनुभव किंवा पुरावे उरले असतील, ते तपासात समाविष्ट करून ही केस अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या या प्रकरणात दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करणे आवश्यक आहे. कोणतीही केस मजबूत करण्यासाठी सुरुवातीला आरोपींच्या अटकेची प्रक्रिया पार पाडली पाहिजे. त्याशिवाय न्यायप्रक्रियेला गती मिळणार नाही. तटकरे पुढे म्हणाल्या, ही केस केवळ वैष्णवीपुरती मर्यादित राहू नये. असे अनुभव घेतलेल्या इतर महिलांनीही पुढे येऊन आपले अनुभव प्रशासनासमोर मांडले पाहिजेत. साक्षीदारांची मदत आणि त्यांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. शासनाच्या आणि पोलिस यंत्रणेच्या मदतीने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे.

भूमिकेवर प्रश्नचिन्ह

वैष्णवी हगवणे यांची मोठी सून हीसुद्धा पीडित होती. तिने महिला आयोगाकडे तक्रार दिली होती, मात्र काहीच हालचाल झाली नाही. यावर प्रतिक्रिया देताना अदिती तटकरे म्हणाल्या, जर आयोगाकडून दुर्लक्ष झाले असेल, तर आम्ही त्यावर निश्चित कारवाई करू. कदाचित वेळेवर पावले उचलली असती, तर वैष्णवी जिवंत असती. मोठ्या सुनेने तक्रार करूनही न्याय मिळाला नाही, हे अत्यंत दुःखद आहे. या प्रकरणात राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने लक्ष घालत असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः या केसच्या प्रत्येक अपडेटवर नजर ठेवून आहोत. कुटुंबाला न्याय मिळावा, हे आपले नैतिक कर्तव्य आहे, असे त्या म्हणाल्या.

Harshwardhan Sapkal : अजित पवार गुन्हेगारी टोळीचे आका

शासनाचा पुढाकार

अशा गंभीर प्रकरणांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती कायदा’चा आधार घेत या प्रकरणाला न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. “केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही सकारात्मक बदल झाले आहेत, त्याचा राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई झाल्याच्या तक्रारी आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिचे बाळ अज्ञात व्यक्तीकडून परत मिळाले, यावर संताप व्यक्त करत तटकरे म्हणाल्या, पोलिस यंत्रणेने चुकीची भूमिका घेतली असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्रीही आहेत, आणि याप्रकरणात कोणतीही दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.

न्याय मिळवून देण्याचा निर्धार

अखेर अदिती तटकरे यांनी ठाम शब्दांत सांगितले, “या कुटुंबाने त्यांची लेक गमावली आहे. आता आम्ही त्यांच्या न्यायासाठी लढा देणार आहोत. आरोपींना शिक्षा होईपर्यंत ही लढाई थांबवणार नाही. ही केवळ वैष्णवीची केस नाही, तर समाजातील प्रत्येक अन्यायग्रस्त महिलेसाठीचा आवाज आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सरकार, प्रशासन आणि महिला आयोगाच्या भूमिकेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अदिती तटकरे यांचे वक्तव्य या प्रकरणाला नव्या वळणावर घेऊन गेले आहे. आता या प्रकरणाचा तपास आणि त्यावरची कारवाई कशी होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!