
WCL मध्ये नोकरी लावतो, असं सांगत अकोल्यातील बेरोजगार तरुणांकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात शिवसेना शिंदे गटातील नेत्याचं नाव वापरून धमक्या दिल्याचा आरोप आहे.
एका माजी आमदाराचा पुतळा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीच काही महिन्यांपूर्वी जाळला होता. नाराजी होती ती राजकीय निर्णयांवरून, पण आता तीच व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र या वेळी वेगळ्या कारणासाठी. अकोला आणि परिसरातील जवळपास 25 तरुणांना ‘WCL म्हणजे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड’मध्ये नोकरी लावून देतो, असं सांगून प्रत्येकी 10 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. नोकरीसाठी प्रत्येकी 20 लाखांचा व्यवहार ठरवण्यात आला होता, त्यापैकी अर्धे पैसे म्हणजे 10 लाख आधीच उकळले गेले. या प्रकारात नागपूरचा वासुदेव हालमारे आणि अकोल्याचा दलाल आशुतोष चंगोईवाला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकूण फसवणूक झालेली रक्कम सुमारे अडीच कोटी रुपये आहे.
या तरुणांना नागपूरमध्ये नेऊन बनावट अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यात आली होती, जणू काही खऱ्या भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचा बनाव केला गेला. आठ महिने उलटल्यानंतरही नोकरी न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणांनी पैसे मागायला सुरुवात केली. त्यावर चक्क धमक्या मिळू लागल्या आणि त्या धमक्या देताना आशुतोष चंगोईवाला हा म्हणत होता की, मी शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा माणूस आहे. म्हणजेच फसवणुकीसाठी थेट एका माजी आमदाराचं नाव वापरण्यात आलं.

आरोप फेटाळले
या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल झाले असून नागपूरचा वासुदेव हालमारे, अकोल्याचा आशुतोष चंगोईवाला आणि त्याच्या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, बाजोरिया यांनी आपण आशुतोषला ओळखतो खरा, पण गेल्या पाच वर्षांपासून संपर्कात नाही, असं सांगत स्वत:वरचे आरोप फेटाळले आहेत. वासुदेव हालमारे याला तर आपण ओळखतच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र जर या दोघांनी फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पण तरीही भाजप-शिंदे गटाच्या आतल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर बाजोरिया यांच्या नावाच्या वापरानेच नवा वाद निर्माण झालाय.
फसवणूक झालेल्या मुलांमध्ये यश गुप्ता, स्वाती ढोरे, समृद्धी पवार, आनंद बोरतने, अक्षय बडगे, अमृता श्रोतरी, राहुल ठाकूर, श्रेयस देशमुख, किरण कोकुलवार, कविता सपातार, मकरंद व्यवहारे, पराग वाघमारे. श्रद्धा वाघमारे, जानवी चक्रपाणी, मयूर बाचांवरे, राकेश शेलार, अशोक लोडम, जयेश खुलेकर, पूजा इंगळे, दर्शन धोटे, सौरभ तागडे, शिवम बदरके, श्याम कदम, दीक्षा खुलेकर आणि रोशन तायडे अशा 25 जणांचा समावेश आहे. प्रत्येकाचं आयुष्य आणि स्वप्नं एका बनावट नोकरीच्या नावे लुटली गेली आहेत.
पोलीस तपास
या साऱ्या घडामोडींमुळे केवळ अकोलाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात संतापाची लाट उसळली आहे. पोलिस तपास सुरू आहे, मात्र यामागे कार्यरत असलेल्या मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्यभरात WCL नोकरीच्या नावाखाली अनेक ठिकाणी अशीच फसवणूक सुरू असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे ही केवळ एक गुन्हेगारी केस नसून, बेरोजगारीच्या काळात स्वप्न विकणाऱ्या माणसांची आणि यंत्रणेतील मूक सहमतीची एक विकृत साखळी आहे.
या प्रकरणाचा निकाल काहीही लागो, पण एका गोष्टीचं भान राहिलंच पाहिजे. ते म्हणजे, कोणत्याही राजकीय वजनाखाली, कोणत्याही शासकीय संस्थेच्या नावाखाली जर कोणी तुमचं भविष्य विकत घ्यायला निघालं, तर त्याचा प्रतिकार करणं ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे. कारण, आता फक्त पुतळे नव्हे… विश्वासही जळत आहेत.