
पावसाळी अधिवेशनात प्रश्नांचं मोहोळ उठलेलं असताना, चंद्रपूरच्या नाल्याच्या भिंतीवरूनच सत्तेच्या भिंतीला तडा गेला. कामाच्या गुणवत्तेवर संतापलेले मुनगंटीवार थेट ‘दादा’ शैलीतील उत्तरावर संतापले आणि शब्दांचा प्रवाह वाहू लागला.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन म्हणजे सरकारसाठी प्रश्नांचा झडगा. याच सत्रात विधानसभेत चंद्रपूरच्या नाल्याच्या कामावरून एक वेगळंच नाट्य रंगलं. माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार, यांनी थेट एका अभियंता आणि संबंधित विभागाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण गंमत म्हणजे त्यांच्या रोषाचा काही भाग थेट मंत्री संजय राठोडांच्या उत्तरांवरही उमटला आणि मग काय, उत्तर आलं, पण ते दादा कोंडके स्टाईलमध्ये?
चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर उभी राहिलेली भिंत, जणू काही पूरापेक्षा अधिक राजकीय लाटा उसळवणारी ठरली. केवळ 100 मीटरच्या या भिंतीने कामाच्या दर्जावरून मोठं राजकीय चिंतन सुरू केलं. आपण इंजिनिअर निवडताना त्याच्याकडून परफेक्शनची अपेक्षा करतो, मग अशा चुका का होत आहेत? असा रोखठोक सवाल करत सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. म्हणाले की, या नाल्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जा असून नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होईल, अशी चिंता आहे.

मंत्र्यांना टोला
संजय राठोड यांच्यावर टोला लगावत मुनगंटीवार म्हणाले, “ज्यांचं नाव ‘एस’ वरून सुरू होतं, त्यांनी ‘नो’ म्हणायचं नसतं, ‘येस’ म्हणायचं असतं.” अभियंत्यांवर कारवाई होईल का? नाल्याची रुंदी किती? प्रवाह थांबणार नाही याची खात्री आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. यावर मंत्री संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं की, या भिंतीचं काम जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत येतं, म्हणूनच प्रश्न माझ्याकडे आला. त्यांनी जिल्हाधिकारीमार्फत चौकशी करण्याची ग्वाही दिली. नाल्याची रुंदी, त्याची अडथळेमुक्तता आणि पुढील काम योग्य प्रकारे व्हावं यासाठी नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
अनपेक्षित उत्तर
राठोड यांनी दिलेलं “सजेशन फॉर अॅक्शन” हे उत्तर मुनगंटीवारांच्या अपेक्षांना पूरक ठरलं नाही. ते म्हणाले, हे अॅक्शन, ओन्ली अॅक्शन, नो रिअॅक्शन असं असायला हवं होतं. सजेशन फॉर अॅक्शन म्हणजे काय? हे तर द्विअर्थी उत्तर झालं, हे काय दादा कोंडकेंचं उत्तर आहे का? नाल्याचे बांधकाम करताना नैसर्गिक प्रवाह कायम राखणं अत्यावश्यक आहे, यावर मुनगंटीवारांनी भर दिला. “सरकार याची हमी देणार का?” हा मूलभूत प्रश्न त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे उपस्थित केला.
Parinay Fuke : भाजप आमदाराने सभागृहात फोडला ‘ड्रग्सचा बॉम्ब’
सुधीर मुनगंटीवार यांनी राठोडांना थेट विचारलं की, आपण नाल्याची रुंदी कायम राहील याची हमी देता का? पण उत्तर मिळालं फक्त एक सूचक वाक्य. सुधीर मुनगंटीवार यांच्या संदेश स्पष्ट होता की, कामात चूक करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई झाली पाहिजे, आणि सार्वजनिक कामांमध्ये अचूकता हवी, यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली.