चंद्रपूरच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांच्या जगण्यात बदल घडवणारा ऐतिहासिक निर्णय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने झाला. वाहतूक शिस्त, चालकांचा सन्मान आणि विकासाचा नवा वेग देणारी ही योजना शहराच्या प्रगतीला नवी दिशा देणार आहे.
चंद्रपूरच्या रस्त्यांवर धावणाऱ्या हजारो ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या जगण्यात नवा पहाटेचा प्रकाश पडला आहे. शहराच्या धावत्या जीवनात हे चालक फक्त प्रवासी वाहतूक करणारे नाहीत, तर दैनंदिन जगण्याच्या गतीला चालना देणारे ‘रस्त्याचे खरे हिरो’ आहेत. या हिरोंच्या समस्या, अडचणी आणि भविष्यातील स्थैर्य यावर आज राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ऐतिहासिक निर्णयांची बरसात झाली.
आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ऑटो चालकांच्या सन्मान आणि सोयीसाठी प्रत्येक स्टॅण्ड हा व्यापारीदृष्ट्या उपयुक्त, पार्किंग व प्रवासी सुलभता असलेला आणि आकर्षक डिझाइनसह तयार झाला पाहिजे. सध्या अस्तित्वात असलेल्या 31 स्टॅण्डची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगाली कॅम्प परिसरात दोन नवे स्टॅण्ड उभारले जातील. याशिवाय बल्लारपूर, मुल, राजुरा, गडचांदूर, भद्रावती व गोंडपिपरी येथील ठिकाणांचीही पाहणी करून योग्य नियोजन केले जाईल. निधी रस्ते सुरक्षा योजना-2016 आणि डीपीडीसीमधून उपलब्ध होणार आहे.
कठोर निकष
ई-रिक्षा केवळ गरजू आणि पात्र व्यक्तींनाच दिल्या जातील, यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण विशेष धोरण आखणार आहे. ई-रिक्षा केवळ ठराविक मार्गांवरच चालतील, तसेच सर्व वितरकांची अधिकृत यादी तयार करण्यात येईल. मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले की, ऑटो रिक्षा चालक हे केवळ सेवा पुरवणारे नाहीत, ते शहराच्या धमन्यांमध्ये रक्तासारखी वाहणारी जीवनशक्ती आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेत ठोस आणि समन्वयात्मक निर्णय घेणे ही आपली जबाबदारी आहे. या निर्णयांमुळे वाहतुकीत शिस्त येणार, अनधिकृत पार्किंग कमी होणार आणि प्रवाशांनाही सुलभ व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चालकांच्या अडचणींवर प्रत्यक्ष चर्चा केली. चालकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी प्रशासन, महानगरपालिका आणि संघटना यांच्यातील समन्वय वाढवण्याचे ठरले. चंद्रपूरच्या रस्त्यांवर आता केवळ रिक्षा नाहीत, तर विकासाच्या गतीला नवी दिशा देणारे ‘चलते-बोलते प्रगतीचे प्रतीक’ धावणार आहेत. मुनगंटीवारांच्या पुढाकाराने घेतलेले हे निर्णय चालकांच्या जीवनात नवा आत्मविश्वास, शहराच्या वाहतुकीत नवी शिस्त आणि प्रवाशांच्या मनात नवा विश्वास निर्माण करतील, हे निश्चित.
धुळीतून उजेडाकडे
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले हे निर्णय म्हणजे फक्त कागदावरची घोषणाबाजी नाही, तर रिक्षा चालकांच्या घामाचा, संघर्षाचा आणि रोजच्या लढाईचा सन्मान आहे. शहराच्या रस्त्यांवर धावणारा प्रत्येक ऑटो आता केवळ प्रवाशांना नाही, तर चंद्रपूरच्या प्रगतीच्या गाडीलाच पुढे नेईल. मुनगंटीवारांचा हा पुढाकार म्हणजे रस्त्याच्या धुळीतून उठून उजेडाकडे जाणाऱ्या प्रत्येक चालकाच्या स्वप्नांना नवा वेग देणारा खरा इंजिन आहे.
बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, तसेच ऑटो रिक्षा मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर राऊत आणि संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.