महाराष्ट्र

IPS Archit Chandak : अकोल्यात श्रावणाच्या श्रद्धेत, नशेची गंगा वाहू देणार नाही

Akola : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे ‘व्यसनमुक्त कावड यात्रा’ मिशन

Author

श्रावणात भक्तीच्या प्रवाहाला व्यसनमुक्तीची दिशा देण्यासाठी अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सज्ज झाले आहेत. कावड यात्रेला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नशामुक्त ठेवण्याचा निर्धार त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केला आहे.

श्रावणाच्या पवित्र महिन्यात, भक्तीचा दरवळ दरवळतोय आणि त्याच वेळी अकोल्याच्या रस्त्यांवर एक ठाम आणि तडफदार आवाज घुमतोय, श्रद्धेला व्यसनाची सावली पडू देणार नाही. हा आवाज आहे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचा. विकासपुरुष आणि देवा भाऊंच्या नागपूरमध्ये वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या आणि गुन्हेगारीला लगाम घालणाऱ्या या कडक IPS अधिकाऱ्यांची अकोल्यात नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं. व्यसनमुक्त अकोला आणि सुरक्षित, सुसंगठित कावड यात्रा.

अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर ही शहराची श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कावड व पालखी यात्रा निघते. गांधीग्राम ते मंदिरापर्यंतचा हा प्रवास केवळ भक्तीचा नसून, शहराच्या सांस्कृतिक शिरकसाचा एक अमूल्य भाग आहे. याच यात्रेला व्यसनमुक्त ठेवण्याचा संकल्प चांडक यांनी घेतला आहे. या यात्रेला नशेची वळवळ लागू द्यायची नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Chandrashekhar Bawankule : गुब्बाऱ्यांचं राज्य नाही, विकासाचं वादळ म्हणजे मोदी

मार्ग सुलभ

या संकल्पासाठी पोलिस विभागाने आधीच बंदोबस्ताच्या तयारीला सुरुवात केली आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदी घाटावर बॅरिकेडिंग करून दोन स्वतंत्र लेन तयार केल्या जाणार आहेत, जेणेकरून गर्दी नियंत्रणात राहील आणि घाटावर जाणे-येणे सोयीस्कर ठरेल. मंदिर परिसरात मागील दरवाज्याचा वापर करून पालखीचा मार्ग सुलभ केला जाणार आहे. कावडधारक आणि भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्राथमिक वैद्यकीय सुविधा, सुरक्षा व्यवस्था अशा सर्व बाबींची यथायोग्य सोय केली जाणार आहे.

अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे ब्रीद अॅनालायझर चाचणीचा वापर. कावड यात्रेदरम्यान कोणताही व्यक्ती नशेत असल्याचा संशय आला, तर त्वरित तपासणी करण्यात येईल. अशा व्यक्तींपासून यात्रा सुरक्षित ठेवण्याचा संकल्प चांडक यांनी उघडपणे जाहीर केला आहे. श्रद्धेचा उत्सव कोणत्याही व्यसनाच्या धुंदीत बिघडता कामा नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

Maharashtra Navnirman Sena : संसदेच्या लॉबीत जय महाराष्ट्रचा नारा

सहकार्याचे आश्वासन

गांधी विद्यालय परिसरात दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यासाठी व्यवस्थापनाशी बैठक घेण्यात आली असून त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. कावड मार्गावर आणि घाटावर प्रकाशयोजना लावून रात्र काळातही सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येणार आहे.

या संपूर्ण नियोजनामध्ये अर्चित चांडक यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, एलसीबी निरीक्षक शंकर शेळके, एसडीपीओ सतीश कुलकर्णी, आणि गजानन पडघन हे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबतही या संदर्भात बैठक घेऊन सर्व यंत्रणांचे समन्वय साधण्यात आले आहेत.

अकोल्यात एक नवीन सामाजिक आणि सांस्कृतिक पायंडा पडतोय, श्रद्धेला व्यसनमुक्तीची जोड देणारा. अर्चित चांडक यांचं हे नेतृत्व म्हणजे केवळ एक प्रशासकीय कृती नव्हे, तर शहराच्या मूल्यांना नवसंजीवनी देणारी मोहीम आहे. या वर्षीची कावड यात्रा, अकोल्यासाठी एक सामाजिक बदलाची सुरुवात ठरणार आहे, अशा इतर सर्व यात्रांपासून वेगळी, व्यवस्थित आणि व्यसनमुक्त.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!