
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोल्यात पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या अध्यक्षतेखाली 88 कोचिंग क्लासेसच्या संचालकांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत ‘C.A.R.E.S.’ संकल्पनेअंतर्गत सुरक्षा उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये सीसीटीव्ही, आपत्कालीन विधा, आणि भावनिक समुपदेशन यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक संस्थांचा नाही, तो संपूर्ण समाजाचा आहे, असं सांगत अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी कोचिंग क्लासेसच्या संचालकांना थेट संवादातून जागरूकतेचं आवाहन केलं. पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘विजय हॉल’ मध्ये झालेल्या या विशेष बैठकीला जिल्ह्यातील तब्बल 88 कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी हजर होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा, आपत्कालीन सुविधा आणि भावनिक स्थैर्य या मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली.

कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील 88 क्लासेसवर पोलीस विभागाने एक सर्वेक्षण राबवले. त्यातून अनेक धक्कादायक आणि काही दिलासादायक बाबी समोर आल्या. 67 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, 37 ठिकाणी सुरक्षा गार्ड, 50 ठिकाणी तक्रार पेटी, 48 ठिकाणी आपत्कालीन सुविधा, आणि केवळ तीन ठिकाणी अँटी-रॅगिंग सेल. विशाखा समित्या केवळ 15 क्लासेसमध्ये कार्यरत असल्याचं निदर्शनास आलं, जे महिला विद्यार्थिनींच्या दृष्टीने चिंताजनक आहे. मात्र 84 क्लासेसमध्ये समुपदेशन सुविधा उपलब्ध असल्याची नोंद घेणं गरजेचं आहे.
सेवेत तत्पर
बैठकीत अनेकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आपली मते मांडली. त्यांनी पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक करताना, भविष्यातील अपेक्षाही मांडल्या. पोलिस प्रशासनाकडून होत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी ‘C.A.R.E.S.’ या संकल्पनेचा सविस्तर परिचय करून दिला. हा उपक्रम केवळ सुरक्षा नव्हे, तर संवेदनशीलतेचा, समजुतीचा आणि मानसिक आरोग्याच्या जाणीवांचा आरसा ठरतो. ‘C.A.R.E.S.’ अंतर्गत CCTV व प्रवेश नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद, भावनिक सुरक्षा आणि समुपदेशन यंत्रणा, संवेदनशीलता वाढवणारे प्रशिक्षण कार्यक्रम, या बाबींचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ औपचारिकता न राहता, ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारली जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. ‘C.A.R.E.S.’ ही संकल्पना केवळ अकोलासाठीच नव्हे तर राज्यभरासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकते. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह म्हणाले, पुढील काही आठवड्यांत आम्ही अकोला जिल्ह्यातील विविध कोचिंग क्लासेसना भेट देऊन त्यांच्या सुरक्षाविषयक अंमलबजावणीवर विशेष स्टोरी सादर करणार आहोत. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आपलीच जबाबदारी आहे. हे लक्षात ठेवून आमच्या न्यूज नेटवर्ककडून हे अभियान सुरू ठेवले जाईल.