
दुर्गम जंगलात वसलेला मेळघाट आता सुरक्षिततेच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. पोलिस यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी मोठे संरचनात्मक बदल प्रस्तावित झाले आहेत.
मेळघाटच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अरण्याच्या कुशीत वसलेल्या, पण अद्यापही मूलभूत सुविधांसाठी झगडणाऱ्या या भागात आता पोलिस संरक्षण अधिक मजबूत होणार आहे. दुर्गमतेमुळे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचणं जिथं कठीण होतं, तिथे आता नव्या पोलिस स्टेशनच्या माध्यमातून त्वरित मदत मिळणार आहे.

मेळघाट परिसराचा भूगोल अत्यंत व्यापक आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीच्या अभावामुळे स्थानिक ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक गावं पोलिस स्टेशनपासून तब्बल 80 ते 90 किमी अंतरावर आहे. प्रवासासाठी पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून अमरावतीचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
सध्या मेळघाटमध्ये केवळ दोन पोलिस स्टेशन कार्यरत आहेत, चिखलदरा व धारणी. परंतु या दोन ठाण्यांची कार्यसीमा इतकी मोठी आहे की अनेक गावं अत्यंत लांब अंतरावर आहेत. त्यामुळे चिखलदरा पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्र विभागून ‘काटकुंभ’ आणि ‘टेंब्रुसोडा’, तर धारणी पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्र विभागून ‘हरिसाल’ आणि ‘सुसरदा’ येथे नव्याने पोलिस स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या चार नवीन पोलिस ठाण्यांची स्थापना झाल्यास, मेळघाटमध्ये पोलिस ठाण्यांची संख्या 2 वरून 6 वर जाईल. यामुळे नागरिकांना पोलिस मदत सहज, त्वरित व प्रभावीपणे उपलब्ध होईल. हे ठाणे त्या त्या गावांपासून थोड्याच अंतरावर असल्याने, पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठीचा वेळ आणि त्रास दोन्ही कमी होणार आहेत.
नवीन ठाणे
परतवाडा हे शहर सध्या झपाट्याने विस्तारत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या परतवाडा पोलिस स्टेशनवर प्रचंड कामाचा ताण आहे. या पार्श्वभूमीवर, ‘परतवाडा ग्रामीण’ नावाने नवीन पोलिस ठाणे स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येईल. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अचलपुर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवला आहे. अचलपुर हे शहर कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत संवेदनशील मानले जाते. त्यामुळे येथे ‘अपर पोलिस अधीक्षक’ या स्वतंत्र वरिष्ठ पदाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार दर्यापुर, अचलपुर, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि चांदुर बाजार हे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय या नवीन अपर पोलिस अधीक्षकाच्या अधिकारक्षेत्रात येणार आहेत. याशिवाय, चांदुर बाजार येथे नवीन ‘उपविभागीय पोलिस अधिकारी’ पद निर्माण करण्याचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. या सर्व प्रस्तावांमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक मजबूत, कार्यक्षम आणि लोकाभिमुख होईल.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलिस मदतीचं वेळीच मिळणं अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आणि काळानुरूप आहे. आता हे प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात उतरले, तर मेलघाटच्या दुर्गमतेवर पोलिस यंत्रणा विजय मिळवेल, यात शंका नाही.