प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया, ज्यांना ‘BeerBiceps’ म्हणून ओळखले जाते, त्यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. त्यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला अश्लील आणि अवमानकारक प्रश्न विचारल्याने देशभरात संताप व्यक्त केला गेला. परिणामी, विविध राज्यांमध्ये त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. यावर न्यायालयाने कठोर भूमिका घेत, त्यांना तात्पुरते सर्व शो बंद करण्याचा आदेश दिला आहे.
रणवीर अलाहबादियाने सर्वोच्च न्यायालयात या एफआयआरविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढत त्यांना अटकेपासून दिलासा दिला असला, तरी त्यांचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
रणवीरला फटकार
मंगळवारी 18 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर रणवीर यांची बाजू मांडण्यात आली. मात्र, कोर्टाने त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
“रणवीरच्या मनात काहीतरी विकृत होते आणि ते त्यांनी या शोमध्ये ओकलं. तुम्ही लोकप्रिय आहात याचा अर्थ तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही. संपूर्ण समाजाला लाज वाटावी असे वक्तव्य करूनही संरक्षण मागता? ही गोष्ट कोणालाही स्वीकारार्ह नाही. हे सर्व कॉर्पोरेट उपक्रमांसाठी आहे आणि तुम्ही कोणासाठी काही करत नाही आहात,” असे न्यायालयाने म्हटले. “तुमचे पालक, भाऊ आणि बहिणींना तुमची लाज वाटेल. तुमची वक्तव्य ऐकून लाजेनं मान खाली जाते”, असे कठोर शब्दांत न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला सुनावले.
नेमकं काय घडलं?
रणवीर अलाहबादिया हे ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. शोदरम्यान, एका स्पर्धकाला त्यांनी अश्लील आणि अपमानास्पद प्रश्न विचारले, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. यानंतर, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसाम यांसह अनेक राज्यांमध्ये रणवीर अलाहबादियाविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
याचिकेद्वारे रणवीर यांनी विविध राज्यांमधील एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला असला, तरी पुढील आदेशापर्यंत त्यांच्या सर्व यूट्यूब आणि इतर शोच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.
सुरक्षेचा मुद्दा
रणवीर यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, “आपल्या देशात कायद्याच्या चौकटीत राहून सुरक्षा मिळू शकते. जर कोणाला धोका असेल, तर राज्य सरकारकडे सुरक्षा मागता येईल.
सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहबादियाला त्यांचा पासपोर्ट तात्काळ पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादग्रस्त एपिसोडसंदर्भात नव्याने कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दूरगामी परिणाम
या प्रकरणामुळे रणवीर अलाहबादिया हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा असल्याचे सांगितले आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
रणवीर सध्या अटकेपासून मुक्त असले तरी त्यांचा पासपोर्ट जमा राहणार आहे. पुढील आदेशापर्यंत ते कोणताही यूट्यूब शो प्रसारित करू शकणार नाहीत. जर सुरक्षेचा मुद्दा गंभीर झाला, तर ते राज्य सरकारकडे सुरक्षा मागू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणावर अंतिम निर्णय न्यायालयाकडून येत्या काही महिन्यांत दिला जाईल. रणवीर अलाहबादियासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, या प्रकरणाचा त्याच्या डिजिटल करिअरवर दूरगामी परिणाम होऊ शकतो
