
बांगलादेशातील रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले आहेत.
मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातून बांगलादेशी रोहिणी या मुस्लिमांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयाअंतर्गत 569 बांगलादेशी मुस्लिमांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा सोमय यांनी केला. यापैकी अधिकांश दाखले मुस्लिमांना देण्यात आले आहेत. केवळ 84 दाखले बांगलादेशातील हिंदू व्यक्तींना देण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
अद्यापही अमरावती जिल्ह्यामध्ये एक हजार अर्ज प्रलंबित आहेत. या सगळ्यांना भारतामध्ये जन्म झाल्याचा दाखला दिला जाऊ शकतो. त्यामुळे बांगलादेशातून आलेल्या या मुस्लिमांना भारताचे नागरिकत्व मिळेल, अशी भीती देखील किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. सोमय्या यांनी व्यक्त केलेल्या या भीतीमुळे त्यांनी महायुती सरकारमधील प्रशासकीय यंत्रणेवरच संशय व्यक्त केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपांनंतर अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

कोणतेही Certificate दिले नाही
किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. जन्म प्रमाणपत्र वाटप करण्याच्या संदर्भात कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असं त्या म्हणाल्या. किरीट सोमय्या यांनी तहसील कार्यालयाला फोनवरून संपर्क केला होता. फोनवर त्यांनी तहसील कार्यालयातून जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मालेगावनंतर अंजनगाव मध्ये असा प्रकार झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र या संदर्भातील वस्तुस्थिती आपण त्यांना सांगितली आहे.
अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून कोणत्याही बांगलादेशी व्यक्तीला जन्म प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे या संदर्भात कोणताही दावा चुकीचा असल्याचे सोळंके म्हणाल्या. जन्म प्रमाणपत्र देताना रहिवाशी असल्याचा पुरावा मागण्यात येतो. ग्रामीण भागातील व्यक्तींकडून सरपंचाचा दाखला मागण्यात येतो. अर्जासोबत स्टॅम्प पेपरवर पडताळणी केली जाते. पूर्णपणे खात्री पटल्यानंतरच जन्म प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. त्यामुळे कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
मालेगाव मध्ये गैरप्रकार
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते. मालेगाव येथील तहसील कार्यालय आणि महापालिकेतून हे प्रमाणपत्र देण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने चौकशीला सुरुवात केली. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी या चौकशीला सुरुवात केली होती. नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी चौकशी केली होती. असाच प्रकार आता अंजनगाव सुर्जीमध्ये घडल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.