नागपूरमध्ये शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून, बनावट प्रमाणपत्रांसह ऑनलाईन सिस्टमचा गैरवापर करून मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे वारे वाहत होते. मात्र नागपूर जिल्ह्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या प्रकरणाने या वाऱ्याला चक्रीवादळाचा वेग दिला आहे. शिक्षक भरती, नियमबाह्य मंजुरी, आणि शालार्थ आयडी यांसारख्या संवेदनशील बाबींमध्ये घोटाळा झाल्याने शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर घाव बसला आहे. यातून विद्यार्थ्यांचं भवितव्यच डळमळू लागलं आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात पोलीस विभागाने वेगवान कारवाई करत शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना अटक केली होती.
बनावट प्रमाणपत्रांवर शिक्षक भरती झाल्याचं आणि शासकीय ऑनलाईन प्रणालीचा दुरुपयोग झाल्याचं प्राथमिक चौकशीतच स्पष्ट झालं आहे.या गंभीर प्रकरणाच्या चौकशीस गती देण्यासाठी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्यीय विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत शालार्थ आयडी घोटाळ्याचा सखोल तपास सुरू आहे. शंका आहे की बनावट शालार्थ आयडी आणि खोट्या प्रमाणपत्रांचा एक संपूर्ण साखळी नेटवर्क तयार करण्यात आला होता. त्यामुळे आता राज्यस्तरीय एसआयटीची मागणी जोर धरत आहे.
Vijay Wadettiwar : जमवा, सावरून बसा, आम्ही येतोय गोळ्या घालायला
लॉगिन पासवर्ड चोरी
नागपूरमधील सदर पोलीस ठाण्याने एक महत्त्वाची कारवाई करत या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार लक्ष्मण मंघाम याला अटक केली आहे. तो नागपूर सोडण्याच्या तयारीत असताना त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. लक्ष्मण मंघामने शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा लॉगिन पासवर्ड चोरून त्यांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार केले. नागपूरच्या वाडी परिसरातील दाभा येथील वासंती अपार्टमेंटमध्ये तो राहात होता. जिथूनच हे सगळं सायबर ऑपरेशन सुरू होतं.
20 मार्च 2019 पासून तो शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बनावट ड्राफ्ट तयार करत होता. पोलीस तपासात उघड झालं की, त्याने उपसंचालक कार्यालयाच्या अधिकारांशिवाय, त्यांच्या लॉगिनचा गैरवापर करून, शासकीय प्रणालीत बनावट डेटा अपलोड केला. या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशयही आहे.राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी लक्ष्मण मंघामविरोधात भारतीय दंड संहितेच्या आधारावर गुन्हा नोंदवला आहे. त्याचबरोबर आयटी ॲक्टच्या कलम 66 (सी) अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
Vijay Wadettiwar : जमवा, सावरून बसा, आम्ही येतोय गोळ्या घालायला
सध्या मंघामला सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास अधिक गतीने सुरू आहे.या घोटाळ्यामुळे राज्यातील शिक्षण यंत्रणेतील माहिती तंत्रज्ञान आधारित प्रणालींच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बनावट नियुक्त्या आणि तांत्रिक गैरवर्तनाच्या या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेचा पाया हादरला आहे.