
महाराष्ट्र सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर नियंत्रण आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही आणि नियम तोडल्यास कडक कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे कुणालाही सरसकट परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा स्पष्ट इशारा देत भोंग्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट पोलिसांवर कारवाई होईल, असे त्यांनी ठणकावले.
विधानसभेत आमदार देवयानी फरांदे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा मांडला. त्यांनी प्रार्थनास्थळांवरील सातत्याने होणाऱ्या आवाजाच्या त्रासाकडे लक्ष वेधत सरकारकडून ठोस पावले उचलण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक शब्दांत भूमिका स्पष्ट केली.

Parinay Fuke : ‘गोसे’ प्रकल्पग्रस्तांच्या हुंदक्यांना फोडला आवाज
नियमांचे पालन अनिवार्य
सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत स्पष्ट केले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही परिस्थितीत भोंगे वाजवता येणार नाहीत. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतही आवाजाची ठरलेली मर्यादा ओलांडल्यास कडक कारवाई केली जाईल. भोंग्यांसाठी निश्चित कालावधीच्या मर्यादा घालून देण्यात आल्या असून, आता परवानगीशिवाय कुठल्याही धार्मिक स्थळी भोंगे लावता येणार नाहीत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठिकाणी पुन्हा परवानगी नाकारली जाईल आणि भोंगे थेट जप्त करण्यात येतील.
थेट कारवाईचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, धार्मिक स्थळांवरील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरले जाईल. जर त्यांनी भोंग्यांबाबतच्या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. कायद्यानुसार, ध्वनीप्रदूषण मर्यादेपेक्षा अधिक असल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवले जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. मात्र, आतापर्यंत या नियमांचा योग्य अवलंब होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
ध्वनिप्रदूषणावर कारवाई
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आक्रमक पवित्रा घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोणत्याही धार्मिक स्थळी भोंग्यांचा वापर करताना ध्वनी मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. सणांच्या काळात काही प्रमाणात सवलत दिली जाऊ शकते, पण दैनंदिन वापरासाठी भोंगे वाजवण्यास आता कडक अटी लागू करण्यात आल्या आहेत.