भाजप ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले असताना, भाजपही शांत बसलेले नाही. आता भाजपने राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे सहा खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापैकी पाच खासदारांची तयारी पूर्ण झाली असून, सहाव्या खासदाराला सामील करून भाजपमध्ये स्वतंत्र गट तयार करण्याचा डाव आखला जात आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी सहा खासदारांचा गट आवश्यक असल्याने भाजप या हालचालींना अंतिम रूप देत असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपचा खेळ
शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार असताना त्यापैकी सहा जण भाजपच्या संपर्कात आहेत, हे या पक्षासाठी मोठे संकट ठरू शकते. भाजपने या खासदारांशी प्राथमिक चर्चा सुरू केली असून कायदेशीर बाबींचा तपास केला जात आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
यापूर्वी भाजपने अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्या गोटात आणले असून आता खासदारांपर्यंत ही मोहीम नेली जात आहे. भाजपच्या या खेळीने उद्धव ठाकरे यांना निवडणूकांपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?
मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जोमाने तयारी करत आहेत. शाखा बैठका आणि कार्यकर्त्यांना एकत्र करण्यावर भर देत ते महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. मात्र भाजपने खासदारांची फोडफाड केल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो.
भाजप आणि ठाकरे गटात सध्या युतीचे वारे वाहत असल्याच्या चर्चा सुरू असल्या, तरी भाजपच्या या हालचालींनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय गणितांना धक्का लागणार हे निश्चित आहे.
भाजपच्या डावाला ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय?
या घडामोडींवर अद्याप उद्धव ठाकरे यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. खासदार फोडफोड रोखण्यासाठी ठाकरे गट काय रणनीती आखतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने हा राजकीय भूकंप कधी घडवायचा याचा निर्णय घेतला नसला तरी या हालचालींनी ठाकरे गटावर दडपण आले आहे.
