
अमरावती विमानतळाचे अधिकृत नामकरण अद्याप झालेले नाही. तरीही उद्घाटनाच्या दिवशी कार्यक्रमात चुकीच्या नावाचा उल्लेख झाल्याने गोंधळ निर्माण झाला.
अमरावती विमानतळाचे औपचारिक नामकरण अद्याप झालेले नसतानाही बुधवारी पहिल्या प्रवासी विमानाने मुंबईकडे उड्डाण घेतले आणि त्यानिमित्ताने झालेल्या शुभारंभ सोहळ्यात एक अनपेक्षित गोंधळ समोर आला. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) आयोजित कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या व्हीडिओ स्क्रिनवर ‘प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ’ असे नाव झळकले. अद्याप कोणताही शासकीय निर्णय झालेला नसताना असे नाव वापरण्यात आल्याने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले.

चार दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. एलायन्स एअरने खासदार बळवंत वानखडे यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रात ‘डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे विमानतळाच्या नावावरून आधीच निर्माण झालेल्या गोंधळात आता आणखी एक नवीन नाव पुढे आले आहे.
Harshwardhan Sapkal : जनतेला फसविणाऱ्या महायुतीविरुद्ध काँग्रेसची वज्रमूठ
एमएडीसी वादाच्या भोवऱ्यात
बुधवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात व्हीडिओ स्क्रिनवर झळकलेल्या नावामुळे एमएडीसीच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप नामकरणावर अंतिम निर्णय झालेला नसतानाही अशा प्रकारे दृश्य सादरीकरणात नाव वापरणे, ही मोठी प्रशासकीय चूक मानली जात आहे. यामुळे उपस्थित अधिकारी आणि नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले.
नावाचे सादरीकरण आमच्या संमतीशिवाय झाले असून, ही चूक कार्यक्रम व्यवस्थापनासाठी नेमलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे. आम्ही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले असून दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे एमएडीसीने याबाबत तातडीने खुलासा करत सांगितले.
Congress : सपकाळांच्या दौऱ्यानंतर जिल्हा समित्या बरखास्त करण्याची मागणी
निमंत्रणावरही प्रकाशझोत
एलायन्स एअरने या गोंधळाच्या काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रात ‘डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ’ असा उल्लेख होता. हा उल्लेख केवळ गुगल सर्चच्या आधारावर करण्यात आल्याचे नंतर त्यांच्या चेअरमन अमित कुमार यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात ही चूक मान्य करून मूळ निमंत्रण पत्र मागे घेतले होते.अशा पद्धतीने एका आठवड्यात दोन वेगवेगळ्या संस्थांकडून विमानतळाच्या दोन वेगवेगळ्या नावांचा उल्लेख झाल्यामुळे प्रशासकीय समन्वयाचा अभाव अधोरेखित होतो.
एकीकडे उद्घाटनाचा जल्लोष, तर दुसरीकडे नावावरून निर्माण होणारे गोंधळ हे अमरावतीच्या नव्या हवाई इतिहासावर पहिले वादाचे डाग ठरू लागले आहेत. राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेले नसल्याने सद्यस्थितीत ‘अमरावती विमानतळ’ हेच नाव वापरले जाईल, असे एमएडीसीने स्पष्ट केले. मात्र यासंदर्भातील चुकांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी यंत्रणांनी अधिक जबाबदारीने आणि समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.
प्रशासकीय अचूकतेचा अभाव आणि सादरीकरणात दिसणारी निष्काळजीपणा यामुळे अमरावतीसारख्या महत्वाच्या शहराच्या नव्या हवाई दालनाचा प्रारंभ वादाच्या सावटाखाली साजरा झाला. आता शासनाच्या अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आणि भविष्यातील कार्यक्रमांची अचूकता हाच नागरिकांचा एकमेव विश्वासाचा आधार बनला आहे.