प्रशासन

Bhandara : पंचायत समितीच्या निष्काळजीपणाचा भीषण वणवा

Vidarbha : सहा दशकांचे दस्तऐवज क्षणार्धात राखेत

Author

तुमसर पंचायत समितीच्या दस्तऐवज खोलीला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत 1965 पासूनचे सर्व दस्तऐवज आणि साहित्य जळून खाक झाले.

तुमसर तालुक्यात शनिवारी सकाळी अचानक घडलेल्या आगीच्या घटनेने संपूर्ण प्रशासन यंत्रणा हादरली आहे. पंचायत समितीच्या नवीन इमारतीतील दस्तऐवज कक्षाला भीषण आग लागली. गेल्या सहा दशकांपासून साठवलेले शेकडो महत्त्वाचे कागदपत्र, संगणकीय उपकरणे, पंखे आणि अन्य साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.

सुदैवाने चौथा शनिवार असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र जळणाऱ्या कागदपत्रांच्या धुराने संपूर्ण इमारत व्यापली. भीषण घबराटीचं वातावरण निर्माण झालं.

Amaravati : बेकायदेशीर ताब्यांवर मनपाचा बुलडोझर चालूच

भ्रष्टाचाराचे पुरावे खाक

दस्तऐवज खोलीत 1965 सालापासून पंचायत समितीच्या विविध प्रकरणांचे, उपक्रमांचे आणि प्रशासनिक निर्णयांचे मूळ दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र, विद्युत उपकरणे सुरू ठेवून कार्यालय बंद करण्याच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दार खिडक्या बंद असतानाही खोलीतील पंखे सुरू होते. त्यामुळे वायरिंगमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक, अधिकारी व कर्मचारी तत्काळ धावले. दमदार प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत सर्व कागदपत्रांचा राखरांगोळी झाला होता.

दस्तऐवज खोलीला लागलेल्या आगीत काही महत्त्वाच्या चौकशी प्रकरणांची कागदपत्रे, सरपंच आणि सचिवांविरोधातील आरोपपत्रे, तसेच भ्रष्टाचाराशी संबंधित फाईलीही भस्मसात झाल्या. त्यामुळे घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रशासनातील अपारदर्शक कारभार, दोषारोपांची मालिका आणि विविध शासकीय तपास प्रकरणांचे पुरावे एका क्षणात नाहीसे झाले आहेत. नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण आहे. प्रशासकीय निष्काळजीपणाविरोधात आवाज उठू लागला आहे.

Bhandara Sand Mafiya : माफियाकडून तहसीलदाराला फाइव्ह स्टार सुविधा

प्रशासनावर गडद सावली

डिजिटल इंडियासारख्या राष्ट्रव्यापी मोहिमेचा गजर असतानाही, पंचायत समितीने वर्षानुवर्षे दस्तऐवजांचे डिजिटल दस्तऐवजीकरण केले नव्हते, हे या आगीत उघड झाले आहे. प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे शतकांच्या ठेव्याचा कायमचा नाश झाला. डिजिटायझेशन प्रक्रियेची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे, लाखो रुपयांचा सरकारी ठेवा आणि महत्त्वाचा पुरावा यापुढे कधीच परत मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

आगीच्या भीषण घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तातडीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पंचायत समितीच्या कर्तव्यपालनातील ढिसाळपणावर मोठा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात अशी आग्रही भूमिका घेतली आहे.

तुमसर पंचायत समितीतील ही आग प्रशासनाच्या नियोजनशून्यता आणि असंवेदनशीलतेचे प्रतिक ठरली आहे. सहा दशके जतन केलेला दस्तऐवजांचा ठेवा एका क्षणात नष्ट झाला. यामुळे पंचायत समितीच्या कारभारावर गडद सावली पडली आहे. यापुढे दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी धोरण राबवणे अत्यावश्यक बनले आहे. अन्यथा प्रशासनातील प्रत्येक पायरीवर नागरिकांचा अविश्वास वाढत राहील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!