प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करून शासनाच्या खोट्या आश्वासनांविरोधात गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या वेदना जागृत करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरून आंदोलनाचं रण मांडलं जातंय. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी रस्त्यावर उतरून सातबारा कोरा करा या मुख्य मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील तीन अधिवेशनांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत निर्णय न घेतल्याने, परतवाडा (अमरावती) येथे चक्काजाम आंदोलन केले. मात्र, हे आंदोलन केवळ वाहतुकीचा अडथळा नव्हता ते सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधातला रोषाचा झंकार होता.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा हा लढा आता रस्त्यावरून गणेशमंडपात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. बच्चू कडू यांनी यंदाच्या गणेशोत्सवाला एक सामाजिक अधिष्ठान देण्याचे भावनिक आवाहन केले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया!’ म्हणताना शेतकऱ्याच्या व्यथा ऐका, त्याच्या घरात एक आशेचा दीप लावा, असा संदेश त्यांनी दिला आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई नव्हे, तर अश्रूंनी न्हालेल्या नजरेत प्रकाश टाकण्याची संधी आहे, असं बच्चू कडू म्हणतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ आकडे नाहीत, त्या एका घराच्या राख झालेल्या कहाण्या आहेत, असं सांगताना त्यांच्या आवाजात भावनांचा हुंकार होता.
Shalartha Id Scam : नागपूरचे दोन शिक्षणाधिकारी अखेर चौकशीच्या पिंजऱ्यात
भक्तीतून आयुष्य वाचवा
महाराष्ट्रातील सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर, गणेशमंडळांनी आपले देखावे फक्त सजावटीपुरते न ठेवता सामाजिक भान दाखवावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. यावर्षी गणेशमंडळांच्या दानपेट्यांमध्ये फुलं नव्हे, तर शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी मदतीचे नाणे टाका, असा आशय त्यांनी व्यक्त केला. गणेशभक्ती म्हणजे केवळ आरास नाही, ती हृदयाची सजावट आहे. दुसऱ्याच्या दु:खाला आपलं समजणे म्हणजेच खरी उपासना असा भावनिक सूर त्यांच्या निवेदनातून उमटतो. शासनाच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी आजही अंधारात आहे.
हमीभावाच्या घोषणा केवळ फसव्या निघाल्या. निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करणारे नेते आज मौन बाळगून आहेत, अशी टीका करताना बच्चू कडू यांनी गणेशभक्तांना उद्देशून म्हटले तुम्ही तरी मौनात राहू नका. आपल्या सणातून समाजाला जागृत करा. ढोल-ताशांच्या गजरातही जर शेतकऱ्याचा आवाज हरवला, तर हा सण फक्त एक उत्सव राहील. पण जर त्या गजरात शेतकऱ्याच्या व्यथा उमटल्या, सरकारच्या निर्णयांवर सवाल उभे राहिले तर, याच उत्सवाला एक नवा चेहरा मिळेल, असं ते म्हणाले. यंदा गणेशोत्सव पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन ‘माणूसपण’ साजरं करायला हवा, हा बच्चू कडूंचा स्पष्ट संदेश आहे. ‘शेतीचे आयुष्य हरवले आहे, पण आपल्या भक्तीतून एखादं आयुष्य वाचू शकते,’ हा संदेश फक्त डोळ्यांत पाणी आणणारा नाही, तर कृतीला प्रेरणा देणारा आहे.
Nagpur : मनसे कार्यकर्त्यांनी एनआयटी कार्यालयात फेकली भ्रष्टाचाराची शाई