महाराष्ट्र

Dilipkumar Sananda : काँग्रेसचा परिंदा आता राष्ट्रवादीच्या खांद्यावर

Buldhana : सानंदांच्या निर्णयामुळे राजकारणात खळबळ

Post View : 47

Author

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे तीन वेळा काँग्रेस आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी गटबाजीला कंटाळून काँग्रेसला अखेर रामराम ठोकला आहे.

जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं अशी हक्काची घोषणा देणारे आणि खामगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांच्या पक्षत्यागाच्या चर्चांना जोर धरलेला असताना, 31 मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामा पाठवून त्यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सानंदा यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्ट शब्दांत आपली खंत व्यक्त करत काँग्रेसमधील गटबाजी आणि पक्षविरोधी कारवाया सहन न झाल्याचे नमूद केले आहे.

पक्षाचे 40 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे पालन करत संघटन वाढीसाठी तन-मन-धनाने कार्य केल्याचे सांगितले आहे. परंतु, जेव्हा पक्षात अंतर्गत गट तयार होऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपच्या उमेदवारांना मदत केली जात होती, तेव्हा त्या कारवायांविरोधात तक्रारी करूनही वरिष्ठांकडून काहीच कारवाई झाली नाही, ही बाब त्यांना खूप चुभली आहे. सानंदा यांच्या मते, 2024 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटासाठी त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली होती. मात्र, याच वेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुलेआम भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, अशाच व्यक्तींना 26 एप्रिल 2025 रोजी खामगाव येथील सद्भावना संकल्प सभा या महत्त्वाच्या पक्षीय कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली.

Nagpur Shiv Sena: समीर शिंदे झाले नागरिकांचे तारणहार

पक्षात दुर्लक्ष झालं

खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वतीताई खासने यांनी 24 एप्रिल रोजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे थेट तक्रार सादर केली होती. परंतु, सानंदा यांच्या म्हणण्यानुसार अद्याप त्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पक्षप्रेम असूनही त्यांनी आपली निष्ठा दुसरीकडे वळवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. दिलीपकुमार सानंदा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात खामगाव येथे एक भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी 5 जून रोजी खामगावात नियोजन बैठक घेण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे.

सानंदा यांचा काँग्रेसमधून एक युग संपलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.1999 मध्ये काँग्रेस-भारिप युतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी खामगावात भाजपचा बालेकिल्ला भेदत विजय मिळवला होता. त्यानंतर सलग तीन टर्म आमदार म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली. मी काँग्रेसचा ऋणी आहे, पक्षाने मला भरभरून दिलं. पण जेव्हा माझ्या विश्वासावर गदा आली, तेव्हा मला हा कठोर निर्णय घ्यावा लागला, असं सानंदा यांनी आपल्या राजीनाम्याच्या शेवटी नमूद केलं आहे. त्यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा देत आपल्या नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. खामगावच्या राजकारणात हा एक मोठा भूकंप मानला जात असून, आगामी निवडणुकीमध्ये याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एक जुना आणि अनुभवी सेनापती गमवावा लागला आहे, तर राष्ट्रवादीने एक नवा चेहरा आपल्याकडे खेचून घेतला आहे.

Akola Shiv Sena : पुतळा जाळला, प्रत्यंचा ताणली आता शरसंधान

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!