ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर खापरखेडा येथे देशभक्तीने भारलेली भव्य तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी आकाश दणाणले.
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पराक्रमाच्या साक्षीदार ठरलेल्या देशवासीयांच्या मनात प्रचंड देशभक्तीची भावना उसळली आहे. याच राष्ट्रप्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी खापरखेडा येथे एक ऐतिहासिक आणि भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.
तिरंगा यात्रेचे आयोजन खापरखेडा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण खापरखेडा नगरी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ च्या घोषणांनी दुमदुमून गेली होती.
भारतीय सैन्याचा पराक्रम
पाकिस्तानकडून काश्मीरमधील पहलगाम येथे करण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत शत्रूंना दिलेल्या सडेतोड उत्तराची आठवण या यात्रेमुळे पुन्हा ताजी झाली. भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आणि धाडस हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याने आपली एकजूट, राष्ट्रनिष्ठा आणि भारतीय सैन्यदलाबद्दलचा अपार विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय लष्करामुळे आपला देश सुरक्षित आहे आणि आपण सर्वजण निर्धास्त आहोत. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर नागरिकांनी व्यक्त केलेला हा राष्ट्रप्रेमाचा अभूतपूर्व प्रतिसाद मनाला भावणारा आहे. तिरंगा रॅलीमुळे खापरखेडा आज देशभक्तीच्या रंगात न्हालं आहे. हीच भावना देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचली पाहिजे.
अभिमान केला व्यक्त
यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचे कौतुक केले. ते म्हणाले, आपले सैन्य कोणत्याही अतिरेकी हल्ल्याला तोंड देण्यास नेहमीच सज्ज आहे. देश सुरक्षित हातात आहे, हेच खरे स्वातंत्र्याचे संरक्षण आहे.
तिरंगा यात्रेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट करताना डॉ. देशमुख म्हणाले, भारतीय जवानांप्रती कृतज्ञता, राष्ट्रभक्तीचा जागर आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडवणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. ऑपरेशन सिंदूरने शत्रूंना जे प्रत्युत्तर दिलं आहे, त्याचा अभिमान संपूर्ण देशाला वाटतो. नागपूर जिल्ह्याची जनता लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
यात्रेत भाजपाचे आमदार चरणसिंग ठाकूर, डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, प्रगती मंडळ, माजी सैनिक, सामाजिक संस्था, सर्वपक्षीय नेते, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावागावांतून आलेल्या माजी सैनिकांच्या उपस्थितीने या यात्रेला आणखी भारदस्त रूप दिले.
देशभक्तीची झलक
भव्य तिरंगा यात्रेमुळे खापरखेडा आणि परिसर पूर्णतः तिरंगामय झाला होता. मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना तिरंग्यांचा महासागर लहरत होता. घोषणांनी परिसर दुमदुमत होता. नागरिकांच्या डोळ्यांत देशभक्तीची झळक स्पष्ट दिसत होती. खापरखेडा येथील ही तिरंगा यात्रा केवळ उत्सव नव्हता, तर भारतीय लष्कराच्या शौर्याला अर्पण केलेला आदर होता. खऱ्या अर्थाने ही यात्रा एक प्रेरणादायी राष्ट्रीय चळवळ ठरली असून, ती सर्वत्र आदर्श ठरेल.