
गोंदियात तापमान 42 अंशांवर पोहोचल्यामुळे दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 ते 4 या वेळेत वाहतूक कमी आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ही उपाययोजना लागू करण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा कहर चांगलाच जाणवू लागला आहे. तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. नागरिकांना आणि वाहनचालकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेने एक महत्त्वाचा आणि नागरिक हिताचा निर्णय घेतला आहे. दुपारच्या वेळात शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहेत.

गोंदिया शहरात दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत, जेव्हा उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते, तेव्हा काही निवडक चौकांतील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्यात येतील. या वेळेत वाहनचालकांना सिग्नलवर थांबावे लागू नये, तसेच उष्णतेचा थेट फटका टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. सिग्नल बंद असताना केवळ ऑरेंज लाईट ब्लिंक मोडमध्ये सुरू राहील, जे वाहतूक सुरू असली तरी काळजीपूर्वक वाहन चालवण्याचा इशारा देतो. यावेळी वाहनचालकांनी चौक ओलांडताना जास्तीत जास्त 20 किमी प्रतितास एवढाच वेग राखण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना दिलासा
उन्हात सिग्नलवर उभे राहावे लागल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वार, वृद्ध, लहान मुले आणि महिला यांना याचा अधिक फटका बसत होता. आता सिग्नल बंद असल्यामुळे चौक ओलांडताना थांबावे लागणार नाही आणि त्यांना थेट दिलासा मिळणार आहे. शहरातील प्रमुख आणि वाहतूक कमी असलेले चौक या निर्णयाच्या कक्षेत येणार आहेत. यामध्ये लेडीज क्लब चौक, जीपीओ चौक, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौक यांचा समावेश आहे. या चौकांमध्ये दुपारच्या सुमारास वाहतूक तुलनेत कमी असते. त्यामुळे याठिकाणी सिग्नल बंद ठेवल्याने गोंधळ होण्याची शक्यता नाही, असा विश्वास वाहतूक विभागाने व्यक्त केला आहे.
गोंदियातील निर्णयाची प्रेरणा नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेपासून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरमध्येही उन्हाच्या तीव्रतेमुळे अशाच प्रकारे दुपारच्या वेळी सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागपूर वाहतूक पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी ही माहिती देताना सांगितले की, सिग्नल बंद ठेवूनही वाहनचालकांनी शिस्त पाळावी आणि सुरक्षिततेसाठी वेग मर्यादा राखावी.
Devendra Fadnavis : लोकशाहीवरच्या पराभवाचं ओझं परदेशात उतरवतायत
उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर स्थानिक प्रशासनाने जनहिताचा विचार करून वेळीच पावले उचलल्याचे या निर्णयातून दिसते. ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत तर राहणारच, पण त्याचबरोबर उष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्याही टाळता येणार आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर गोंदियाचा हा निर्णय अन्य जिल्ह्यांसाठीही एक दिशा ठरू शकतो. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने घेतलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे.