महाराष्ट्र

Parinay Fuke : भंडाऱ्यात एकच कायदा; नियमात राहिल त्याचाच फायदा

Sand Mafiya Case : अनियंत्रित प्रशासकीय वेगाना परिणय फुकेंचा ‘रेड सिग्नल’

Post View : 31

Author

अनियंत्रित प्रशासन आणि बेलगाम अधिकाऱ्यांनी आता भंडारा जिल्ह्याचा धसका घेतला आहे. नागरिकांची कामं टाळत आपलं हित साधणाऱ्या चार अधिकाऱ्यांची भंडाऱ्यात विकेट गेली आहे. भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या चारही विकेट घेतल्या आहेत.

सामान्यांच्या कामांकडं दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची बदली केल्यानंतर भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचा प्रशासकीय यंत्रणेवरील धाक वाढला. परंतु त्यानंतरही चुकीच्या ‘ट्रॅक’वर चालणाऱ्या आणखी दोन अधिकाऱ्यांच्या वेगाना डॉ. फुके यांनी ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे. गेल्या काही दिवसांपासून भंडाऱ्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला होता. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांनी तक्रार केली होती. तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू झाली. पण ‘फास्ट अॅक्शन’ तेव्हा झाली, ज्यावेळी डॉ. फुके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले.

आमदार डॉ. परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय. त्यामुळं त्यांनी वाळू माफियांबद्दल मुख्यमंत्र्यांजवळ शब्द टाकताच सरकारी यंत्रणा पूर्ण ताकदीनं कामाला लागली. मुख्यमंत्र्यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट फोनच लावला. काही तासातच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाका, असं फडणवीस यांनी बावनकुळे यांना सांगितलं. वाळू माफियांविरोधात सुरुवातीपासून महसूल मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अशातच आमदार डॉ. फुके यांनी केलेली तक्रार बावनकुळेंच्या हाती पडली व्हाया मुख्यमंत्री. त्यानंतर तर महसूल विभाग कामालाच लागला.

Bhandara Sand Mafiya : तुमसरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

सुटीवरूनच घरी पाठवले

वाळू माफियांशी साटंलोटं असल्याचा दोन अधिकाऱ्यांवर ठपका होता. पहिले होते तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले. दुसरे त्यांचे वरिष्ठ अधिकारी दर्शन निकाळजे. निकाळजे हे उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल विभागाच्या सेवेत दाखल झालेत. त्यांच्याकडं तुमसरच्या उपविभागीय अधिकारी पदाची जबाबदारी होती. वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही दोन्ही अधिकारी वाळू माफियांकडं दुर्लक्ष करीत होते. मात्र कारवाई झाली, त्यावेळी ज्यांचे ‘चरण’ या अधिकाऱ्यांनी धरले होते ते वाळू माफिया सुरक्षित राहिले. विकेट गेली ती दोन्ही अधिकाऱ्यांची. यातील एका अधिकाऱ्याचा नुकताच विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते रजेवर होते. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या दणक्यामुळं सुटीवरूनच त्यांना घरी जावं लागल्याची चर्चा भंडाऱ्याच्या प्रशासकीय वर्तुळात आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची विकेट घेणाऱ्या आमदार डॉ. परिणय फुके यांच्यामुळं आणखी दोन अधिकारी घरी गेले. त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेत बऱ्यापैकी दिसला. निलंबन आदेश रस्त्यात असतानाच भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते. ‘फिल्ड’वर उतरले. त्यांनी अनेक ठिकाणी आकस्मिक तपासणी केली. मात्र तक्रार झाल्याचं कळल्यामुळं वाळू माफिया ‘अलर्ट’ झाल्याचं दिसलं. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या एका पत्रामुळं पुन्हा एकदा भंडारा प्रशासनाला मोठा फटका बसला आहे. यावरून डॉ. फुके यांच्या एकूणच राजकीय शक्तीचा अंदाज येतो. इतकेच नव्हे तर डॉ. फुकेंच्या भंडाऱ्यात सर्वांसाठी एकच कायदा; नियमात राहिल त्याचाच फायदा, असं आता अधिकाऱ्यांमध्ये बोललं जात आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!