
नागपूर दंगलीवर टीव्ही डीबेटमध्ये भूमिका मांडणाऱ्या भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नागपूर शहरात दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर रोज नवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असताना, या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजय पाठक यांना थेट परदेशातून धमकीचे फोन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाठक यांनी नागपूर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या धमक्यांमागे कोण आहे, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

नागपुरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून आलेले आहे. नुकतेच आरोपी फहीम खान याच्या घरावर नागपूर महानगरपालिका कडून बुल्डोजर चालविण्यात आले आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर अजय पाठक यांनी नागपूर दंगलीवर एका टीव्ही चर्चेत भाजपची भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांना एका अज्ञात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धमकीचा फोन आला. फोनवर असलेल्या व्यक्तीने पाठक यांना इशारा देत सांगितले की, ‘जो तुम कर रहे हो, वह ठीक नहीं है… इसलिये तुम्हारे साथ जो होगा, वह ठीक नहीं होगा’
सुरक्षेची मागणी
पाठक यांना आलेली ही धमकी सिरियातून आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. पाठक यांनी या संदर्भात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. स्वतःच्या सुरक्षेची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे नागपूरच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. धमकीचा फोन आल्यापासून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेषतः सायबर सेल या फोनचा उगम कुठून झाला, नंबर कोणाचा आहे, आणि यात कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाचा हात असू शकतो, याचा शोध घेत आहे.
नागपूर महापालिकेने दंगलीतील काही आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची योजना आखली होती. मात्र, न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये स्थगिती दिल्यामुळे ही कारवाई तूर्तास थांबली आहे. महापालिकेने फहीम खान आणि हाफिज नसीम शेख यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली होती. पण, याचिकाकर्त्याने ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिल्याने, बुलडोझर कारवाई लांबणीवर पडली आहे.
नवीन आरोपी समोर
कथित प्रकरणामध्ये आणखी एका आरोपी शेख नाझिम याच्या घरावरही महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत न्यायालयाची स्थगिती मिळवली आहे. पोलिस आणि प्रशासनाची ही कारवाई राजकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर दंगलीनंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली, तरी या नव्या घडामोडींमुळे प्रकरण आणखी गंभीर वळण घेत आहे.