
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यावेळी 11 जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली होती. आता आणखी दोन माओवादी शरण आले आहेत.
गडचिरोलीत आणखी दोन जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. आतापर्यंत एकूण 693 माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. बुधवार, 08 जानेवारीला आणखी दोन जहाल महिला माओवादी पोलिसांना शरण आले आहेत. शामला झुरु पुडो ऊर्फ लिला आणि काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी ही शरण आलेल्या माओवाद्यांची नावे आहेत. यातील शामला 36 वर्षीय तर काजल 24 वर्षांची आहे.
शामला झुरु पुडो ऊर्फलीला ही 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. 2002 मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. 2002 मध्ये प्लाटुन क्रमांक तीनमध्ये तिची बदली करण्यात आली. तेथे तिने 2007 पर्यंत काम केले. 2007 मध्ये कंपनी क्रमांक चारमध्ये तिला पाठविण्यात आलं. 2008 मध्ये पीपीसीएम पदावर तिला बढती देण्यात आली. त्यानंतर ती सेक्शन कमांडर झाली. कंपनी क्रमांक चारमध्ये सेक्शन कमांडर म्हणून तिने 2010 पर्यंत काम केले. त्यानंतर तिला कंपनी क्रमांक 10 मध्ये बदली देण्यात आली.

अनेक Encounter मध्ये सहभाग
माओवादी चळवळीत तिच्यावर आजपर्यंत एकूण 45 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 21 चकमकीचे गुन्हे आहे. जाळपोळ करण्याचे सहा गुन्हे आहेत. 18 इतर गुन्ह्यांमध्ये तिचा समावेश आहे. काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी जानेवारी 2018 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ती सदस्य म्हणून काम करीत होती. तिच्यावर आजपर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये चार चकमकीचे गुन्हे आहेत. एक गुन्हा जाळपोळीचा आहे. तीन इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. ग्डचिरोलीच्या जंगलात पोलिस आणि सुरक्षा दलांचा दबाव वाढला आहे. त्यामुळं माओवाद्यांना जंगलात फिरणं अवघड झालं आहे. चळवळीत महिलांच्या आरोग्याकडं दुर्लक्ष केलं जातं, असं दोघींनी सांगितलं.
चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जातात. मात्र महिला माओवादी ठार होतात. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून अनेकांना मारलं जातं. दलममधील वरिष्ठ माओवाद्यांकडून महिलांना भेदभावाची वागणूक दिली जाते. जनतेचा पैसा नेते स्वत:साठी वापरतात. आदिवासी युवक-युवतींचा गैरवापर केला जातो. त्यांना विनाकारण खोटं सांगून भडकविलं जातं असं दोन्ही महिलांनी पोलिसांना सांगितलं. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शामलाविरोधात आठ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. काजलच्या नावानं दोन लाख रुपयांचं बक्षीस होतं.
शामला आणि काजल यांनी आत्मसमर्पण केल्यानं त्यांना सरकारकडून आता मदत करण्यात येणार आहे. शामलास साडेपाच लाख तर काजलला साडेचार लाख रुपये मिळतील. गडचिरोली पोलिस दलानं यध्या माओवाद विरोधी अभियान तीव्र केलं आहे. त्यामुळं चकमकीत जीव जाण्याच्या भीतीनं माओवादी आत्मसमर्पण करीत आहेत. 2022 पासून आतापर्यंत एकूण 46 जहाल माओवादी शरण आले आहेत. 2025 सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात 13 माओवादी पोलिसांना शरण आले आहेत.
प्रशासनाला मोठं Success
01 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंद्धी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 11 जहाल माओवाद्यांनी शस्त्र टाकली. राज्याच्या नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी यासाठी प्रयत्न केले. सीआरपीएफच्या अभियान विभागाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल हे देखील माओवाद विरोधी अभियान राबवित आहेत. सीआरपीएफच्या 113 बटालीयनचे कमांडंट जसवीर सिंग हे नीलोत्पल यांच्यासह काम करीत आहेत. विशेष म्हणजे गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातून अलीकडच्या काळात एकही आदिवासी तरूण किंवा तरूणी माओवादी चळवळीत दाखल झालेले नाहीत.