
राज्यातील आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना (ठाकरे गट) आमदारांची महत्वपूर्ण बैठक घेतली.
राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्ष यंदाच्या अधिवेशनात काय रणनीती आखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत आगामी अधिवेशनात चर्चेसाठी कोणते मुद्दे मांडायचे, सरकारला कशा पद्धतीने घेरायचे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठीही ठाकरे गटाने आपला दावा मजबूत करण्याचे ठरवले आहे.
महाविकास आघाडीचा दावा
नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यात आला होता. मात्र, त्या वेळी महायुती सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती आणि हा मुद्दा प्रलंबित राहिला. आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाने पुन्हा एकदा आपला दावा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना विरोधी पक्षनेते पदासाठी आक्रमक भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, यासाठी योग्य उमेदवार निवडण्याचा निर्णयही आमदारांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांचे लक्ष आता विरोधी पक्षनेतेपदावर स्थिरावले आहे.
Ramdas Kadam: उद्धव ठाकरेंना ‘उद्ध्वस्त’ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
कोण होणार नेता
ठाकरे गटाच्या वाट्याला जर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद आले, तर त्या पदासाठी तीन प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात आहे. ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ही तीन नावे प्रबळ दावेदार म्हणून समोर आली आहेत. यापैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास त्यासाठी कोणत्या नेत्याची निवड करायची, याचा संपूर्ण निर्णय शिवसेना आमदारांच्या मतांवर अवलंबून असेल. उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय सर्व आमदारांवर सोपवला असल्याने पुढील काही दिवसांत या संदर्भात महत्त्वाचे घडामोडी होण्याची शक्यता आहे.
सरकारविरोधात आक्रमक भूमिका
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाने सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची, याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांवर भर देत सरकारला धारेवर धरण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
अधिवेशनात शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारी, वाढती महागाई, शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील महत्त्वाचे विकास प्रकल्प या मुद्यांवर चर्चा करून ठाकरे गट सरकारला धारेवर धरणार आहे.