महाराष्ट्र

Uday Samant : साथ तोडण्याचा प्रयत्न केविलवाणा

Shiv Sena : आधी कामकाज शिका, मग टीका करा 

Author

महाराष्ट्राच्या राजकीय रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकार भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने उलथापालथ घडत आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधाऱ्यांकडून आता त्यांना प्रत्युत्तर मिळायला सुरूवात झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंवर जोरदार टीका करत म्हटले, “उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दरी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हा ठाकरेंचा बालिशपणा आहे. मात्र, फडणवीस आणि शिंदे यांची साथ अभेद्य असून, अशा निराधार टीकांमुळे महायुती सरकारला कोणताही धोका नाही.

कार्य प्रगतीपथावर

सामंत पुढे म्हणाले की, महायुती सरकारच्या वचननाम्यात दिलेली सर्व आश्वासने पुढील पाच वर्षांत पूर्ण केली जातील. मात्र, निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह तयार करून मिळविलेली मते हातातून निसटतील या भीतीनेच ठाकरे गट भाजप आणि शिंदे गटावर टीका करत आहे. पण जनतेने आम्हाला कौल दिला आहे आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार आहोत.

Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला

उदय सामंत यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख केला. राष्ट्रभक्त मुस्लिमांचे समर्थन बाळासाहेब ठाकरे कायम करत आले. आम्ही त्यांच्याच विचारांवर चालत आहोत. मात्र, काहींना निवडणुकीच्या आधीच मुस्लिम मतांचे राजकारण करायचे आहे, हे आता उघड झाले आहे, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.

प्रक्रियेचा अभ्यास करा

सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेतील भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानभवनात येऊन पत्रकार परिषद घेतल्याने विधिमंडळात चर्चा केल्यासारखे होत नाही. ज्यांनी अधिवेशनात कामकाजात सक्रिय सहभाग घेतला नाही. त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांना सभागृहाच्या कामकाजावरून शिकवण्याची गरज नाही. संसदीय प्रक्रियेचा अभ्यास करून तासन्तास सभागृहात चर्चा करणे ही खरी जबाबदारी आहे,” असा सल्ला त्यांनी दिला.

सरकारच्या परखड निर्णयांमुळे महायुती सरकारवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार भक्कमपणे पुढे जात आहे. उद्धव ठाकरे यांची टीका केवळ राजकीय निराशेचे लक्षण आहे, असेही सामंत म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!