महाराष्ट्र

Shiv Sena : संजय गायकवाडांच्या बेताल बोलण्यावर सामंत यांचा संताप 

Uday Samant : शिवसेना नेत्याच्या पोलिसांबाबत वादग्रस्त विधानावरून वाद 

Author

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठले आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या पोलिसांविषयी वादग्रस्त विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाम आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा 27 एप्रिल रविवारी नागपूर दौरा पार पडला. सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच पोलिस खात्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, पोलिसांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये देणे अयोग्य आहे.

सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्र पोलीस व मुंबई पोलीस यांनी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील यंत्रणेबद्दल जाणीवपूर्वक व जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, संजय गायकवाड यांना आपल्या विधानाची चूक लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ माफी मागितली आहे. यापुढे अशा प्रकारचे प्रकार टाळले जातील याची जबाबदारी आपली आहे.

लंडन प्रवास

शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या बॅनर वॉरबाबत विचारल्यावर उदय सामंत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ज्यांचे अस्तित्वच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संपवले, त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेचे काही सोयरसुतक ठेवण्याची गरज नाही. शिंदे शेतीसाठी गेले असताना देखील टीका झाली. आम्ही जेव्हा जम्मू-कश्मीरमध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी मदतीला गेलो, तेव्हाही टीका झाली. मात्र, जेव्हा त्यांचा संपूर्ण गट लंडनला गेला, तेव्हा आम्ही कोणतीही टीका केली नाही. हा आमचा मोठेपणा आहे.

Prakash Ambedkar : सिंधू जल करार रद्द नाही, सरकार खोटं बोलतं

खाद्य व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी ‘लाडली बहिनींना दोन हजार 100 रुपये’ मिळतील,असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवरही उदय सामंत यांना विचारण्यात आले. यावर सामंत म्हणाले, मला झिरवळ साहेबांनी नेमके काय म्हटले याची माहिती नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावर आवश्यक ते स्पष्टीकरण दिले आहे. सामंत पुढे म्हणाले, निवडणुकीचा अजेंडा ठरवणाऱ्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. योग्य वेळी, योग्य निर्णय घेतले जातील. लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन योजनांचा अंतिम निर्णय सरकार घेईल.

या संपूर्ण संवादादरम्यान उदय सामंत यांनी ठाम भूमिका घेत राज्य सरकारच्या धोरणांचा पाठिंबा दर्शवला. त्यांनी सांगितले की, सरकार लोकांच्या हितासाठी काम करत आहे आणि विरोधकांनी केवळ टीकेसाठी टीका न करता सकारात्मक भूमिका घ्यावी.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!