
शिवरायांच्या भूमीत औरंगजेबच्या कबरीचा वाद पेटला आहे.खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठिंब्यामुळे हा विषय राजकीय रणांगणात नवा पेच निर्माण करत आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला पत्र लिहून औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या मागणीला आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचा देखील पाठिंबा मिळाल्याने वातावरण अधिक तापले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या या कबरीविरोधात राज्यभर आंदोलनाचे सत्र सुरू झाले असून, सरकारला त्वरित निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या आहेत. या मुद्द्यावरून राज्यभर रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याचे आणि बजरंग दल यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर सरकारने जर ही कबर हटवली नाही, तर अयोध्येतील राम मंदिर आंदोलनाच्या धर्तीवर कारसेवा करून ती हटवण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.

Anil Deshmukh : भाजप नेते जाणूनबुजून धार्मिक भावना भडकवत आहेत
इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज
उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबच्या कबरीविरोधात उघड भूमिका घेतल्याने या वादाला नवे राजकीय परिमाण मिळाले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आणि हिंदू धर्माचा संहार करणाऱ्या शासकाची समाधी महाराष्ट्रात असणे ही स्वाभिमानाच्या विरुद्ध बाब आहे. त्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन करणे आणि महाराष्ट्राच्या भूमीतून औरंगजेबच्या कबरीचा हटवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
भोसले यांच्या या मागणीनंतर भाजपच्या इतर नेत्यांकडूनही या विषयावर जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठ मतदारांना गोंजारण्यासाठी हा मुद्दा वापरण्यात येतोय, अशी टीका विरोधक करत असले, तरी शिवप्रेमींमध्ये मात्र भोसले यांच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळत आहे.
भोसले यांच्या मागणीनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले आहे. नागपूरसह मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आणि कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलने होण्याची शक्यता असून, राज्य प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नागपूरमध्ये गांधी गेटसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन होणार असून, इतर शहरांमध्येही अनेक ठिकाणी मोर्चे काढले जाणार आहेत. संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला असून, जर औरंगजेबची कबर लवकरात लवकर हटवली नाही, तर ती हटवण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.
राजकारणाला नवा वेग
संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राजकीय अजेंडा पुढे येत असल्याचे दिसत आहे. भाजप खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेमुळे हा विषय आता अधिक गंभीर झाला आहे. त्यांच्या मागणीनंतर संघटनांनी उचल घेतल्याने राज्य सरकारवर मोठा दबाव येऊ शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा हिंदुत्ववादी मतदारांना एकत्र करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. शिवभक्त उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे जात असल्याने महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे.