महाराष्ट्र

Uddhav Thackeray : काम माझे, नाव फडणवीसांचे

Shiv Sena : पराभवाचे कारण सांगत भाजपवर जोरदार हल्लाबोल

Post View : 19

Author

लोकसभेत मोठे यश प्राप्त झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठी अपेक्षा होती. परंतु महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी कारण सांगितले आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. ईशान्य मुंबईत आयोजित निर्धार शिबिरात त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत आगामी निवडणुकांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत पराभवाचे कारण सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आपण गाफील राहिलो, म्हणून पराभव स्वीकारावा लागला. आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो. पण आता ही चूक पुन्हा होऊ द्यायची नाही. यावेळी त्यांनी मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पावरूनही भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. कोस्टल रोड हे माझे स्वप्न आणि माझी संकल्पना आहे. भूमिपूजन मी केले होते. हे काम माझे असूनही फडणवीस त्यावर आपली नाव गोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राचे चाणक्य नवा अध्याय लिहायला सज्ज

मुख्यमंत्र्यांना आवाहन

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले. तुम्ही लोकांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करायला तयार आहात का? शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी द्या, महिलांना दरमहा दोन हजार 100 रुपये द्या. मालकाच्या मित्राला खूश करण्यासाठी कांजुरमार्गची जागा देणारे आता लोकांचे हित साधतील का? असा थेट सवाल ठाकरेंनी केला.

भाजपच्या हिंदुत्ववादावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपचे हिंदुत्व म्हणजे एक फेक नॅरेटिव्ह आहे. संघाच्या गंगाजल हातात घेऊन फिरणाऱ्या मानसिकतेपासून आम्ही वेगळे आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे आहोत. आमच्यासोबत मुस्लिम समाज आला तर तो ‘वोट जिहाद’ म्हणतात. पण मोदींनी स्वतः सांगितले की, त्यांच्या बालपणी मुस्लिम शेजारी घरी यायचे. मग ते त्यांना पुरी-भाजी खाऊ घालायचे का? असा उपरोधिक टोला ठाकरे यांनी लगावला.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी सज्ज राहण्यास सांगितले. आता स्कोअर किती झाला याची चिंता नाही, विरोधकांची दांडी उडवायची आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार असून ठाकरे गट विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!