
एकेकाळचे सावलीसारखे सोबती, नंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धे झालेले ठाकरेबंधू तब्बल दोन दशके एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर अखेर पुन्हा एका व्यासपीठावर आले आहेत. केवळ भेटले नाहीत, तर महाराष्ट्राला पुन्हा एकत्र येण्याची हमी देऊन गेले.
एका काळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल दोघांनीही उचलली होती. पण कालांतराने ती दोन वेगळ्या वाटांनी जळू लागली. एक शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदावर पोहोचला, तर दुसरा ‘मनसे’च्या रणगाड्याला एकहाती ओढत राहिला. या दोघांनी एकमेकांविरुद्ध अनेकदा टीकेची तोफ डागली, परंतु इतिहासाचं चक्र फिरलं आणि अखेर 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात हे केवळ ‘क्षणिक शहाणापणा’ नसून, नव्या युतीची पहाट असू शकते, असा आजचा संदेश या दोघांनी मुंबईतल्या भव्य मेळाव्यात दिला.
मुंबईत 5 जुलै रोजी ठाकरे गट आणि मनसेचा विजयी मेळावा पार पडला. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मेळावा एक ऐतिहासिक क्षण ठरला. एकाच व्यासपीठावर तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. उपस्थितांच्या डोळ्यांत आश्चर्याचा, कौतुकाचा आणि काहीसा अविश्वासाचाही एकत्रित ठाव दिसून आला.

Navin Jindal : राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? भाजप नेत्याचा हल्ला
अंतरपाट केला दूर
या व्यासपीठावर आधी राज ठाकरे यांनी भाषण करत उपस्थितांना सडेतोड भाषेत संबोधित केलं. त्यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. उद्धव ठाकरे म्हणाले, राज आणि माझी भेट आज व्यासपीठावर झाली. त्यांनी मला ‘सन्माननीय’ म्हटलं, मीही त्यांचं कर्तृत्व पाहिलं आहे. आमच्यात अंतरपाट होता, तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही, आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहण्यासाठीच आलो आहोत.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’ घोषणेवर बोचरी टीका करताना म्हटलं, एका गद्दाराने काल जय गुजरात म्हटलं. ‘पुष्पा’ चित्रपटातला दाढीवाला ‘झुकेगा नही’ म्हणतो, पण हा दाढीवाला म्हणतो ‘उठेगा नही साला’. काहीही झालं तरी उठणार नाही. ठाकरे यांनी भाजपच्या कारभारावर मिश्किल शैलीत निशाणा साधताना म्हटलं की, कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलावू नका. जेवायला येतील आणि नवरा-बायकोत भांडण लावून जातील, नाहीतर नवरी पळवून नेतील.
आजोबांनी दिला लढा
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात चर्चांचा ज्वालामुखी पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. ही केवळ एक राजकीय कृती नव्हे, तर दोन ठाकरे परंपरांचा, दोन वेगवेगळ्या वाटा चाललेल्या विचारांचा आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील संभाव्य नवे समीकरणांचं उद्घोषण ठरू शकतं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ‘भोंदूबाबा’ व ‘आडमुठ्या धार्मिक नौटंकी’ वरही तिरकस टिका केली. आज अनेक बुवा लिंब कापत आहेत, टाचण्या मारत आहेत. पण या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे खरे वारस आम्ही आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे हे एकत्र येणे केवळ एका विषयापुरते मर्यादित राहील का? की महाराष्ट्रात एका नव्या ‘ठाकरे युगाचा’ आरंभ होईल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच राजकारणाच्या रणभूमीत मिळेल. पण आजचा दिवस इतकं मात्र स्पष्ट करून गेला की, ठाकरे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मध्यभागी येण्यास सज्ज आहे. एकत्र आलेले ‘ठाकरे’, महाराष्ट्राच्या हृदयात पुन्हा धगधगणारं वादळ? की नव्या पर्वाची शांत सुरुवात? राजकारण सध्या तरी उसळून बोलतंय, ‘हे काही साधंसोपं नाही.