महाराष्ट्र

Operation Sindoor : उद्धव ठाकरेंना हवी अंतर्गत सफाई 

Uddhav Thackeray : देशातील 'स्लीपर सेल्स'चा नायनाट व्हावा

Author

पहलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील अतिरेकी तळांचा खात्मा केला. या कारवाईचं कौतुक करत उद्धव ठाकरे यांनी आता देशातील स्लीपर सेल्सच्या समूळ उच्चाटनाची ठाम मागणी केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निसर्गरम्य परिसरात झालेला भीषण आणि अमानुष दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या नरसंहाराने देशभरात संताप उसळला. मात्र, भारतीय सेनेने शांततेच्या मुखवट्यामागे लपलेल्या हिंसक छायांना धक्का देणारी ‘ऑपरेशन सिंदूर’ही जोरदार कारवाई केली.

6 मे रोजी रात्री भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 प्रमुख आतंकवादी तळांवर अचूक आणि प्रखर हवाई हल्ले चढवत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. संपूर्ण देशभरात या कारवाईचे अभिनंदन सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या धाडसी पावलाचे स्वागत करत आणखी एक निर्णायक मागणी समोर ठेवली आहे. भारतात सक्रिय असलेल्या पाकिस्तान-समर्थित ‘स्लीपर्स सेल्स’चा तात्काळ नाश करावा.

देशांतर्गत गुप्त दहशतवादी

उद्धव ठाकरे म्हणाले, भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जे शौर्य दाखवले ते प्रत्येक भारतीयाच्या अंत:करणात अभिमानाचे स्थान घेते. पहलगाममधील आमच्या 26 मायभगिनींच्या कुंकवाचा बदला घेणारे हे मिशन केवळ सैनिकी कारवाई नाही, ती देशाच्या अस्मितेची पुनर्स्थापना आहे. पुढे बोलताना त्यांनी असेही स्पष्ट केले की, पाकिस्तान आपल्या भूमीवरून फक्त दहशतवादी पाठवत नाही, तर आपल्या देशातच स्लीपर्स सेल्सच्या माध्यमातून अंतर्गत विघटनाची बीजे पेरतो आहे. आता ही वेळ आहे की, या देशांतर्गत गुप्त दहशतवाद्यांचे नेटवर्क उध्वस्त करण्यात यावे. केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्र आणि निर्णायक पावले उचलावी.

Vijay Wadettiwar : सरकारचं पाऊल ठाम असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा नक्की

या हवाई कारवाईमध्ये अत्याधुनिक लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. रात्रीच्या अंधारात, अत्यंत गुप्ततेने रचना करण्यात आलेल्या या मिशनमध्ये भारतीय गुप्तचर संस्था ‘मिलिटरी इंटेलिजन्स’च्या अद्वितीय समन्वयाचे दर्शन घडले. 9 प्रमुख ठिकाणांवर बॉम्बिंग करताना जेएसओ (Joint Strike Operation) ची अचूकता व युद्धनीती नजरेत भरली. कारवाईमुळे जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या संघटनांचे प्रमुख तळ नेस्तनाबूत झाले. माहितीनुसार पाकिस्तानच्या ISI मधील काही गुप्त अधिकाऱ्यांचाही यामध्ये बळी गेल्याची शक्यता आहे.

निर्णायक प्रहार

उद्धव ठाकरे यांनी असेही म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले की भारतीय सेना केवळ सीमेपलीकडेच नव्हे तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही सज्ज आहे. परंतु आता सरकारनेही समान धारदार भूमिका घेत ‘स्लीपर्स सेल्स’वर निर्णायक आणि चिरस्थायी प्रहार केला पाहिजे. अनेक राजकीय नेते आणि संरक्षण विश्लेषकांनीही स्लीपर्स सेल्सच्या विरोधात कठोर कारवाईसाठी आवाज उठवला आहे. भारतीय सेनेच्या या अद्वितीय आणि धाडसी कारवाईने पाकिस्तानसह जगालाही एक स्पष्ट संदेश दिला. भारताच्या सहनशीलतेला कमकुवतपणाचे समजू नका.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!