
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या यांच्या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र झळकले आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीदरम्यान, पक्षाने शिवाजी पार्क, दादर येथे लावलेल्या बॅनरांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना त्यांच्या प्रतिमेचा वापर न करण्याची सूचना केली होती. त्यामुळे, अनेक वर्षांनंतर मनसेच्या बॅनरांवर बाळासाहेबांची प्रतिमा दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात गुढीपाडवा मेळाव्यासाठी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरांवर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असून, त्यावर “बाळासाहेब आपला वारसा खऱ्या अर्थाने चालवत आहेत राज ठाकरे” असा मजकूर आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे यातून दिसतंय. जर महाराष्ट्रात जिंकायचं असेल, गद्दारांनी देखील बाळासाहेबांचा फोटो वापरला होता. तसाच सगळ्यांना आता बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
राजकीय तापमान
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, पक्षाने शिवाजी पार्क आणि सेनाभवन परिसरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. या बॅनरांमध्ये राज ठाकरेंना “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे” असे संबोधले आहे. गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसेच्या या हालचालींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आणि आगामी काळात या वादाचे परिणाम काय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिवेशनाबाबतही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘हे अधिवेशन म्हणजे सरकारच्या अपयशाला झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न होता.’ सरकारने 100 दिवसांत मोठे बदल घडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या अधिवेशनात त्या संकल्पाचा कुठेही उल्लेख झाला नाही. ना कुठले ठोस निर्णय घेतले गेले, ना कोणत्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी झाली.
राज्यात गंभीर गुन्हे घडले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण, स्वारगेटमधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांनी प्रकाशझोतात येण्यास सुरुवात केली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर) राजीव जैन करत आहेत. एसआयटीने संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली असून, या प्रकरणाची सखोल तपासणी केली जात आहे.