प्रसिद्ध सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी थेट नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
देशाच्या न्यायव्यवस्थेचा एक तटस्थ, धाडसी आणि बुद्धिमान चेहरा आता संसदेत आपली उपस्थिती नोंदवणार आहे. देशातल्या सर्वात गाजलेल्या खटल्यांत ठामपणे सरकारच्या बाजूने उभे राहत, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत संघर्ष करणारे प्रसिद्ध सरकारी वकील पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांची भारताच्या राज्यसभेसाठी थेट नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या ऐतिहासिक निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. संपूर्ण देशभरातून त्यांच्या कार्याची जोरदार दखल घेतली जात आहे.
अजमल कसाबसारख्या थरारक खटल्यापासून, तेलगी घोटाळा, कोपर्डी बलात्कार प्रकरण, ते प्रफुल्ल गुहा हत्याकांडापर्यंत अनेक उच्च-प्रोफाईल प्रकरणांमध्ये उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादकौशल्याने कायद्याचं आणि राष्ट्रहिताचं संतुलन साधत, गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळवून दिली. त्यांच्या कायदेशीर लढ्यांमुळे केवळ न्याय मिळवला गेला नाही, तर समाजाला एक संदेशही मिळाला की गुन्हेगार कितीही प्रभावशाली असो, कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवता येतो.या निवडीनंतर, संपूर्ण देशातून अॅड. निकम यांचं कौतुक सुरू असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनीही विशेष गौरव करत आपली भावना मांडली.
विचारमंथनात नवे संदर्भ
देशातील कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि प्रभावी कार्य करणारे पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून झालेली निवड ही केवळ व्यक्तिगौरव नाही, तर संपूर्ण कायदा व्यवस्थेचं सन्मानचिन्ह आहे. त्यांनी अनेक अतिसंवेदनशील खटल्यांत राष्ट्रहित जपलं आहे. त्यांच्या प्रखर तत्त्वनिष्ठेचा, नैतिक मूल्यांचा आणि न्यायदृष्टिकोनाचा आदर होणं आवश्यकच आहे, असं डॉ. फुके यांनी सांगितले.अॅड. निकम यांच्यासोबतच राज्य सभेसाठी निवड झालेली आणखी तीन नामवंत व्यक्तिमत्त्वं म्हणजे, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहास संशोधिका डॉ. मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर.
चारही व्यक्तींनी आपल्या-आपल्या क्षेत्रात राष्ट्रहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. फुके म्हणाले की, ही निवड केवळ गौरवासाठी नाही, तर विचारमंथनाच्या सभागृहात समाजहिताचे नवे संदर्भ निर्माण करण्यासाठी आहे. या अनुभवी मंडळींच्या उपस्थितीमुळे राज्यसभेत विचारमंथन अधिक प्रगल्भ, मार्गदर्शक आणि राष्ट्राभिमानी होणार आहे, असा विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी या सर्व मान्यवरांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.कायद्याच्या क्षेत्रात साडेतीन दशकांचा अनुभव, राष्ट्रहितासाठी झिजलेले जीवन आणि न्यायव्यवस्थेवर निखळ श्रद्धा हे उज्ज्वल निकम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सार आहे. आता त्यांच्या विचारांची आणि अनुभवांची संगत भारताच्या विधीमंडळाला मिळणार आहे. त्यांची ही नियुक्ती म्हणजे भारताच्या लोकशाहीच्या मूल्यांना दिलेला नवा टोकदार आवाज आहे.
Devendra Fadnavis : सरकारी वकिलीपासून राज्य सभेपर्यंतचा ‘उज्ज्वल’ प्रवास