केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्राच्या विकासाची गाथा गायली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा मोठ्या राजकीय संदेशांनी गाजला. 26 मे रोजी नागपूर आणि नांदेडमध्ये झालेल्या दौऱ्यादरम्यान शहा यांनी एका बाजूला विकासाचे स्तोम उभारले, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात क्रमांक 1 राज्य बनेल.
नांदेडमध्ये पार पडलेल्या भव्य जाहीर सभेत शहा यांनी आपले भाषण भारत माता की जयच्या घोषणांनी सुरु केले. त्यांनी नांदेडच्या वारशाचे स्मरण करत गुरु गोविंद सिंग, रेणुका देवी आणि ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांना वंदन केले. पुढे ते म्हणाले, नांदेडची भूमी ही प्रेरणेची आहे, इथून उठलेला आवाज पाकिस्तानपर्यंत पोहोचतो.
राजकीय संकेत स्पष्ट
आपल्या भाषणात शहा यांनी नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 22 तारखेला पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांचा खातमा केला गेला. 4 तारखेला 9 अतिरेकी अड्ड्यांचा नाश झाला. 9 तारखेला पाकच्या ड्रोन हल्ल्याला आपल्या लष्कराने हवेतच प्रत्युत्तर दिलं. यावरून भारत आता फक्त सीमांवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही निर्णायक भूमिका घेतोय, असा संदेश जगाला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईला सिंदूर हे नाव दिले आणि स्पष्ट केले की, भारताच्या माता-भगिनींच्या सन्मानाशी कोणीही खेळू शकत नाही.
ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टचा उल्लेख करत शहा यांनी छत्तीसगडमधील माओ अड्ड्यांच्या उद्ध्वस्तीची माहिती दिली. 31 मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद निर्मूलनाचे आश्वासन दिले. या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावरही शहा यांनी खरमरीत टीका केली. हे कोणाची वरात आहे? असा सवाल करणाऱ्या ठाकरे यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, बाळासाहेब असते तर आज मोदींना मिठी मारून अभिनंदन केलं असतं. शहा यांनी भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून करून राजकीय संकेतही दिला.
मराठीला अभिजात दर्जा
मराठवाड्यातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना शहा म्हणाले, फडणवीसांनी 2019 मध्ये 40 हजार कोटींचा वॉटर ग्रिड प्रकल्प सुरू केला. 11 बांधांमधून पाइपलाइनद्वारे मराठवाड्याच्या प्रत्येक गावात पाणी पोहोचवण्याचे काम चालू आहे. आघाडी सरकारने थांबवलेली ही योजना पुन्हा गती पकडत आहे. पुढील 5 वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याचे सांगत शहा यांनी शरद पवारांवरही टीका केली. ते वर्षानुवर्षे केंद्रात होते, पण मराठीसाठी काहीच केलं नाही, असे म्हणत त्यांनी पवारांची कार्यशैलीच सवालात घेतली. शेवटी, अमित शहा म्हणाले, 2047 मध्ये भारत विकसित राष्ट्र बनेल आणि त्यात महाराष्ट्राचं योगदान सर्वात मोठं असेल. छत्रपती शिवाजी महाराज, टिळक, सावरकर यांची भूमी देशाच्या प्रगतीचा अग्रदूत बनेल.
