महाराष्ट्र

Holi 2025 : कर्तव्य अन् रंगांची जोडी, नागपूर पोलिसांची अविस्मरणीय होळी

Nagpur : कडक ड्यूटीनंतर पहिली रंगांची ब्युटी

Author

 नागपूर शहर पोलिसांनी यंदा होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत पहिल्यांदाच पोलिसांसाठी विशेष रंगोत्सव आयोजित केला. कर्तव्याच्या शिस्तीत रंगांचा उत्साह मिसळत, या सोहळ्याने संपूर्ण पोलीस दलाला तणावमुक्त करण्याचा आनंददायी अनुभव दिला.

कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदारीत नेहमी व्यस्त असलेल्या नागपूर शहर पोलिसांनी यंदा होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. पहिल्यांदाच पोलिसांसाठी खास रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले, जिथे कर्तव्याच्या शिस्तीत रंगाचा उत्साह मिसळला. नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण पोलीस दलाला तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि एक अविस्मरणीय क्षण तयार केला.

सण कोणत्याही एका समूहासाठी नसतो, तो सगळ्यांसाठी असतो. मात्र, जबाबदाऱ्या आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेल्या पोलिसांसाठी अनेकदा सण म्हणजे ड्युटी आणि बंदोबस्तच असतो. परंतु यंदा या परिस्थितीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता, पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर, नागपूर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष धुलीवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

Chandrashekhar Bawankule : बांधकामाचा खर्च कमी करण्याची सुवर्णसंधी

उत्साहाचा जश्न

पोलिस मुख्यालयाचे मैदान विविध रंगांनी न्हाल्यासारखे दिसत होते. गुलालाच्या उधळणीने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. जांभळ्या, हिरव्या, गुलाबी आणि केशरी रंगांनी आसमंत फुलला होता. पोलिसांचे हसरे चेहरे, संगीताच्या तालावर थिरकणारे पाय, आणि मनमोकळ्या गप्पांनी संपूर्ण परिसर आनंदाने न्हाऊन निघाला.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल स्वतः आपल्या पत्नी वनिता सिंगल यांच्यासह या सोहळ्यात सहभागी झाले. त्यांच्यासोबत सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, शिवाजी राठोड, प्रमोद शेवाळे, पोलिस उपआयुक्त निकेतन कदम, अश्विनी पाटील, श्वेता खेडकर, राहुल मदने, शशिकांत सातव आणि विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारीही मोठ्या उत्साहात सहभागी झाले. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण केवळ एक सण नव्हता, तर आपल्या कर्तव्यदक्ष जीवनशैलीत आनंदाची भर टाकणारा अनुभव होता.

आनंदही गरजेचा

14 मार्च रोजी, नागपूर पोलिसांनी पहाटे 5 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत शहरभर कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली. कुठेही अनुचित प्रकार घडू न देता संपूर्ण शहरात शांतता राखण्यात आली. मात्र, या कडक बंदोबस्तानंतरचा थकवा आजच्या रंगोत्सवात पूर्णपणे विरघळून गेला.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी आपल्या मनोगतातून पोलिसांच्या मानसिक तणावमुक्तीवर भर दिला. कर्तव्य बजावणे हे नक्कीच प्राथमिकता असते, पण त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांचा मानसिक आणि शारीरिक आनंदही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे असे उपक्रम सातत्याने घेतले जावेत, असे सिंगल म्हणाले.

Vijay Wadettiwar : गुन्हेगाराला शिक्षा नको, कारण खर्च वाढेल

उत्सवाचा आनंद मिळाला

रंगांच्या या सोहळ्यात कोणताही पदभेद नव्हता. वरिष्ठ असो वा कनिष्ठ, सगळ्यांनी एकमेकांना रंग लावले. आयुष्याच्या प्रवासात जसे विविध अनुभव येतात. या रंगोत्सवातही सगळे रंग एकत्र मिसळले. रंग, संगीत, हास्य आणि आनंद. हा क्षण पोलिस दलाच्या आठवणीत कायम राहणार आहे.

कार्यक्रमाच्या अखेरीस पोलिसांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. “पहिल्यांदाच आपल्या सेवेत असा आनंदाचा क्षण अनुभवला,” असे अनेक पोलिसांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्व श्रेय पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना देण्यात आले. ज्यांच्या पुढाकारामुळे हा ऐतिहासिक सोहळा घडून आला.

हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक सण नव्हता, तर तो पोलिसांसाठी ताजेतवाने करणारा अनुभव होता. कर्तव्याच्या शिस्तीतही उत्सव साजरा करता येतो, हे या रंगोत्सवाने सिद्ध केले. या पुढील काळात अशा कार्यक्रमांचे आयोजन होईल, अशी अपेक्षा सर्व पोलिसांनी व्यक्त केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!