
अमरावती जिल्ह्यात आरोग्यसेवेत क्रांती घडवत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणाची अत्याधुनिक सुविधा उभारली जात आहे. ही यंत्रणा संपूर्ण विदर्भासाठी नवजीवनाची नवी आशा ठरणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील आरोग्य सेवेला आता नवे आयाम मिळत आहे. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी अत्याधुनिक झोनल यंत्रणा उभारली जात आहे. ही यंत्रणा केवळ अमरावतीच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. या माध्यमातून हजारो रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. अमरावती आधुनिक वैद्यकीय सुविधांचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येणार आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे अवयव प्रत्यारोपणाची सुविधा आता प्रत्यक्षात साकार होऊ घातली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. यामागे आमदार सुलभा खोडके यांचे विशेष प्रयत्न आहेत. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे अमरावतीत ‘ऑर्गन ट्रान्सप्लांट झोनल यंत्रणा’ ही लवकरच कार्यान्वित होणार आहे.

ट्रान्सप्लांट प्रक्रिया
यंत्रणेत किडनी, लिव्हर, हृदय अशा गुंतागुंतीच्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी आवश्यक सर्व अद्ययावत सुविधा एकत्रितपणे उपलब्ध असतील. दोन उच्च दर्जाची ऑपरेशन थिएटर उभारली जाणार आहेत. एक ऑर्गन रिट्रायव्हल तर दुसरे ट्रान्सप्लांट प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. ही संपूर्ण रचना केवळ तांत्रिक सोयीपुरती मर्यादित नाही. प्रशिक्षित डॉक्टरांची चमू, त्यांच्या कौशल्यवाढीसाठी विशेष प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी उपक्रमही त्यात अंतर्भूत आहेत.
या उपक्रमांतर्गत अमरावतीत झोनल ट्रान्सप्लांट कार्यालयही स्थापन केले जाणार आहे. यामार्फत संपूर्ण झोनमध्ये कोणत्या रुग्णालयात कोणता अवयव उपलब्ध आहे. याची अचूक माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल. गरजू रुग्णांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचाही समावेश असेल. ही यंत्रणा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.
नवा मानबिंदू
केवळ स्वप्न पाहणे नव्हे, तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही माझी भूमिका आहे, असे मत आमदार खोडके यांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्याने वैद्यकीय सेवा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अवयव प्रत्यारोपणाची सुविधा हे या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ आरोग्यसेवेला चालना देणारा नसून, विदर्भाच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिणारा ठरेल. अमरावती आता आधुनिक, विश्वासार्ह आणि जीवनदायी वैद्यकीय केंद्र म्हणून लौकिक प्राप्त करणार, हे नक्की.