गडचिरोलीत नक्षलवाद मावळत असताना, शहरी नक्षलवाद अफवांच्या रूपात डोके वर काढतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी विकासाच्या या वाटचालीत सजग राहण्याचे आवाहन केले.
गडचिरोली जे राज्यातील सर्वात मागास भागांपैकी एक म्हणून ओळखले जात होते, आज विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत आहे. जंगलाच्या सावलीतून उभं राहत असलेलं हे जिल्हा आता ‘स्टील हब’ बनण्याच्या वाटेवर आहे. मात्र, याच विकास प्रक्रियेला काही शहरी नक्षलवादी विचारधारा असलेली मंडळी अडथळा निर्माण करत आहेत, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे कोनसरी येथे लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या 4.5 MTPA क्षमतेच्या भव्य पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन करताना बोलत होते. याच कार्यक्रमात 100 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सीबीएसई पद्धतीची आधुनिक शाळा आणि कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले.
Devendra Fadnavis : अति डाव्या विचारांच्या गर्भगृहात राहुल गांधी
संविधानाचा मार्ग
फडणवीस म्हणाले की, गडचिरोली ही नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून जेव्हा ओळखली जायची, तेव्हापासूनची ही वाटचाल खडतर होती. पण आता इथले चित्र बदलले आहे. बंदुकीच्या नादापासून बाहेर पडून अनेकांनी संविधानाचा मार्ग स्वीकारला. मात्र, नक्षलवाद फक्त जंगलात नव्हता, आता तो शहरी स्वरूपात विचारांच्या पातळीवर उगम पावत आहे. या ‘शहरी नक्षलवाद्यां’कडून अफवांचं राजकारण केलं जातंय.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, विकास सुरू होताच काहीजण जमिनी हिसकावल्या जात आहेत, जंगल नष्ट होत आहे, अशा अफवा पसरवत आहेत. हे केवळ आदिवासींना घाबरवण्याचे आणि त्यांच्या मनात संशय निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र केवळ देशांतर्गत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून पोसले जात आहे.
हजारो स्थानिकांना रोजगार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गडचिरोलीला स्टील हब बनवण्याच्या दिशेने सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा दिला. 2016 पासून सुरू असलेलं लोह उत्खननाचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागलं आहे. या प्रकल्पांच्या अटींमध्ये स्थानिक रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. आतापर्यंत 14 हजार स्थानिकांना या प्रकल्पांमुळे रोजगार मिळाला आहे. महिलांसाठीही ही क्रांतीसदृश बाब आहे, हाऊसकीपिंगपासून ते 55 हजार रुपयांच्या पदांपर्यंत त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
C.P Radhakrishnan : भाषा शिकण्यासाठी हात उगारणे गरजेचे आहे का?
‘ग्रीन गडचिरोली’ या संकल्पनेवर त्यांनी विशेष भर दिला. विकास हवा, पण तो पर्यावरण पूरक हवा, असं सांगत त्यांनी 80 किलोमीटर लांबीच्या स्लरी पाइपलाइनचा उल्लेख केला. ही पाइपलाइन कार्बन उत्सर्जनात तब्बल 55 टक्क्यांची घट घडवेल. ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील चौथी अशा प्रकारची प्रकल्प पाइपलाइन ठरणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात गॅसवर चालणारी वाहने आणि ई-व्हेइकल्सचा वापर वाढवून ‘ग्रीन ट्रान्सपोर्टेशन’ला चालना देण्यात येईल.
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
देवेंद्र फडणवीस यांनी पुढील दोन वर्षांत एक कोटी झाडे लावण्याचा संकल्पही व्यक्त केला. वनसंवर्धन हे केवळ घोषवाक्य नाही, तर भविष्यातील शाश्वत विकासाचा आधार आहे, असे ते म्हणाले. याशिवाय, उत्तम शिक्षण आणि दर्जेदार आरोग्यसेवा यासाठी सरकारने भक्कम पावले उचलली आहेत. 100 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे गडचिरोलीतील नागरिकांसाठी आरोग्याची मोठी हमी ठरेल. आता उपचारासाठी त्यांना नागपूर किंवा हैदराबाद धाव घेण्याची गरज भासणार नाही, असं ते म्हणाले.
एकेकाळी नक्षलवादामुळे काळसर चित्र असलेल्या गडचिरोलीचा चेहरामोहरा आता हिरवट, स्वावलंबी आणि औद्योगिक दिशेने बदलत आहे. मात्र, या वाटचालीत अफवांचा आणि विचारांच्या गोंधळाचा धोका कायम आहे. म्हणूनच, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा महत्त्वाचा आहे. बंदुकीचा नक्षल संपतोय, पण शहरी मुखवट्यातून येणाऱ्या विचारांचा नवा नक्षल अजूनही सावध राहण्यास भाग पाडतोय.