राजकीय मैदानात आज पुन्हा ठिणगी उडाली, जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या 160 जागांच्या दाव्यावर बोचरी उपमा मारत थेट हल्ला चढवला. ‘मंडल यात्रे’च्या आडून ओबीसींच्या भावनांवर खेळ सुरू असल्याचा आरोप करत, त्यांनी पवारांना थेट कोर्टात येण्याचे आव्हान दिले.
राजकीय रणांगणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेला एक स्फोटक फटका थेट शरद पवारांच्या अंगावर जाऊन बसला आहे. 160 जागांच्या दाव्याचा विषय काढत आंबेडकरांनी पवारांवर ताशेरे ओढत, ही अवस्था म्हणजे अगदी वराती पाठीमागून घोडे, अशी चपखल उपमा मारली. त्याचसोबत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘मंडल यात्रे’वर सरळसरळ राजकीय स्वार्थ साधण्याचा आरोप करत, ओबीसी समाजाच्या भावनांवर खेळू नका, असा रोखठोक इशारा दिला.
शरद पवारांच्या 160 जागांच्या दाव्याबाबत बोलताना आंबेडकरांनी हल्ला चढवला. ईव्हीएम संदर्भात न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही पूर्वीच सर्व पक्षांना आवाहन केले होते. तेव्हा मात्र कुणीही आमच्या पाठीशी उभे राहिले नाही. न्यायालय हेच ते व्यासपीठ आहे जिथे दूध का दूध, पाणी का पाणी होते. पण वेळेत पाऊल उचलण्याऐवजी आता फक्त बोंबलत बसले आहेत. किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते, असा बोचरा टोला त्यांनी लगावला.
Chandrashekhar Bawankule : राजकीय पोळी भाजून घ्यायचा काँग्रेसचा प्रयत्न
घाबरत नसाल, तर सामील व्हा
आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्यासाठी आम्ही पत्र लिहिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळली असली तरी आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलो आहोत. जर तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही मोदींना घाबरत नसाल, तर या लढ्यात सहभागी व्हा. हे आव्हान थेट पवारांच्या दिशेने होते.
राहुल गांधींना भेटल्याच्या पवारांच्या दाव्यावर आंबेडकरांनी शंका उपस्थित केली. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या घरी येणाऱ्यांची नोंद ठेवली जाते. मग पवारांसोबत गेलेली ती दोन माणसं कोण? त्यांची नावे का जाहीर करत नाही? सामान्य माणसाला भ्रमित करू नका. जिथे खरी लढाई द्यायची, तिथे पाय मागे घेतात, हीच या आघाडीची स्थिती, असे ते म्हणाले.
राजकीय गणित
आंबेडकरांनी ‘मंडल यात्रा’वर निशाणा साधत जुनी राजकीय पार्श्वभूमी उघड केली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला विरोध करणारे तेच राष्ट्रवादी होते. ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाणार नाही, कारण श्रीमंत मराठा हा एनसीपीचा गड आहे. त्यामुळे ही यात्रा ओबीसींच्या भल्यासाठी नव्हे, तर राजकीय आकडे जुळवण्यासाठी आहे, असा त्यांचा आरोप होता.
Nagpur Traffic : पोलिसांची केवळ चमकोगिरी; साध्या टर्नलाही जागा नाही
दरम्यान, क्रांती दिनी नागपूर येथून शरद पवारांनी हिरवा झेंडा दाखवत ‘मंडल यात्रा’ला प्रारंभ केला आहे. तब्बल 52 दिवस चालणारी ही मोहीम राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरेल. पवारांच्या कार्यकाळात 1992 मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्याची आठवण करून देत, मागील 50 वर्षांत ओबीसींसाठी केलेल्या कामांचा आढावा यातून मांडला जाईल, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. त्याचबरोबर भाजपच्या 1990 मधील मंडल अहवालाविरोधातील भूमिकेवर हल्ला चढवण्याचीही योजना आहे.
महायुतीकडून आधीच या यात्रेवर सडकून टीका होत असताना, प्रकाश आंबेडकरांच्या या थेट आणि तिखट विधानामुळे राजकीय वातावरण अजून पेटण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. पवारांना दिलेलं मोदींना घाबरत नसाल तर मैदानात या, हे आव्हान आता पुढच्या काही दिवसांत नवा राजकीय रंग आणणार, हे नक्की.