उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर परत येताना भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात.
भारताच्या राजकीय आकाशात 9 सप्टेंबर रोजी एक नवा तारा चमकला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. देशाच्या नवीन उपराष्ट्रपती पदाचा मान त्यांना मिळाला असून, या निवडणुकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. देशभरातील खासदारांनी दिल्ली गाठत या निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला. पण या राजकीय उत्साहाच्या लाटेत एक धक्कादायक घटना घडली. भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला भीषण अपघाताचा सामना करावा लागला.
निवडणुकीचा गाजावाजा संपल्यानंतर दिल्लीहून परतणारे डॉ. पडोळे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे निघाले होते. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ त्यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) गाडीला गुरुवारी (11 सप्टेंबर रोजी) सकाळी सहाच्या सुमारास एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. क्षणार्धात गाडीचा तोल गेला. धातूचा कर्कश आवाज आणि धुळीचा लोट रस्त्यावर पसरला. पण नशिबाने साथ दिली आणि खासदार पडोळे यांच्यासह सर्व सहकारी सुखरूप आहेत. गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी डॉ. पडोळे हे किरकोळ जखमी झाले. स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पडोळे यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या अभावावर संताप
प्राथमिक माहितीनुसार समोरून येत असलेल्या गाडीचे संतुलन बिघडल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार पडोळे यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. स्थानिक प्रशासनाने वाहन रस्त्याच्या कडेला हलवले असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. काहींच्या मते, रस्त्यावरील गैरजवाबदारीमुळे हा अपघात घडला. या घटनेने भंडारा-गोंदियातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा-गोंदिया जिल्हा नक्षलप्रभावित म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत खासदार डॉ. प्रशांत पडोळे व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारकडे विशेष सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे नियमाप्रमाणे प्रत्येक खासदाराला एक सशस्त्र रक्षक (Armed Guard) मिळतो. भंडारा-गोंदिया जवळील भाग नक्षलप्रभावित क्षेत्र असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. डॉ. पडोळे यांनी शासकीय सुरक्षा पुरवली गेली नसल्याने संताप व्यक्त केला आहे. तथापि, गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत. त्यांना देखील विशेष सुरक्षा नाही. अशात प्रशांत पडोळे यांनी मात्र विशेष सुरक्षेची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलप्रभावित भाग असल्यामुळे, भंडारा येथे एक आणि गोंदिया येथे दोन म्हणजे एकूण तीन गार्ड्स सुरक्षा पुरवतात. काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी मात्र सुरक्षा नाकारली आहे.