
गोंदियातील शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या लढ्यात वीजपुरवठ्याचं संकट अधिकच गहिरं होतंय. या गंभीर परिस्थितीत आमदार विनोद अग्रवाल शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिकेत उतरले आहेत.
शेतकऱ्यांना 12 तास अखंड वीजपुरवठा झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. असा ठाम इशारा गोंदियाचे भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भातशेती केली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना 12 तास वीज दिली जात होती. मात्र तापमान वाढल्यानंतर वीज कंपनीने वीजपुरवठा आठ तासांवर आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

शेतकऱ्यांनी लावलेली भाताची पिके पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र सध्या वीज नसल्याने बोरवेलद्वारे पाण्याचा पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी पिके कोमेजू लागली आहे. उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या त्रासलेल्या शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
शेतकऱ्यांसाठी लढा
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आमदार अग्रवाल यांनी थेट महावितरणच्या गोंदिया कार्यालयात जाऊन मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधीक्षण अभियंता रामाराव राठोड आणि कार्यकारी अभियंता आनंद जैन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अधिकाऱ्यांना रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिवसाकाठी 12 तास सलग वीजपुरवठा करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी केली. यासोबतच त्यांनी निवेदनही दिलं. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्याच्या अडचणी सोडवणं आपली जबाबदारी आहे. जर दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मी स्वतः शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेन, असा ठाम इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी दिला आहे.
वीजपुरवठा कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी पंप चालवण्यासाठी शेतात जातात. त्यामुळे त्यांचा मानसिक आणि शारीरिक थकवा वाढतोय. काही ठिकाणी पंप सुरू करताना अपघातही झाले आहेत. वीज नसल्याने शेतकऱ्यांचे सिंचनाचे वेळापत्रक कोलमडले असून, पिकांची वाढ खोळंबली आहे. विशेषतः लहान व मध्यम शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसतो आहे. ते भांडवल करून बी-बियाणे, खते घेतात आणि बोरवेलचे दररोज खर्च भागवतात. पण जर पाणीच मिळालं नाही, तर सगळा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या तणावात आहे.
धोरणांवर प्रश्नचिन्ह
महावितरणकडून यावर्षी सुरुवातीला 12 तास वीजपुरवठा करून नंतर अचानक वेळ कमी करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाही. यामुळे शासनाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शेतकऱ्यांनी आधीच उन्हाळ्यातील भीषण परिस्थितीचा सामना करताना पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता वीजच नसल्यानं त्यांची सर्व मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष येत्या दोन दिवसांत महावितरणकडून येणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांची भूमिका लढवय्याची असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत.