महाराष्ट्र

Akola BJP : साजिद खान पठाण करतायत चमकोगिरी

Development Politics : रस्ता बनतोय विकासाचा पण राजकारणात वळण खोट्याचं

Share:

Author

अकोल्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची चाहूल लागताच डाबकी रोडच्या विकासावरून श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे. भाजप नेते आणि आमदार साजिद खान पठाण यांच्यात खऱ्या विकासकर्त्याचा सवाल आता चांगलाच पेटला आहे.

राजकीय रणधुमाळीने पुन्हा एकदा अकोल्याचे वातावरण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, विकासकामांवरून श्रेयवादाची नवी लढाई उफाळून आली आहे. एकीकडे भाजपचे स्थानिक नेते आपल्या नेत्यांच्या मेहनतीचा पुराव्यानिशी गौरव करत असताना, दुसरीकडे सत्ताधारी आमदार साजिद खान पठाण यांच्यावर ‘चमकोगिरी’चा आरोप करत भाजप आक्रमक पवित्र्यात दिसत आहे.

जुने शहरातील डाबकी रोडयेथील रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी निधी मिळवण्याचे आणि पाठपुराव्याचे श्रेय माजी आमदार आणि अकोल्याचे लोकप्रिय नेते दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्याकडे जाते, असे भाजप नेते माजी महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले आहे. अग्रवाल यांनी सडेतोडपणे आरोप केला की, पठाण यांनी डाबकी रोडच्या कामासाठी कोणताही निधी मागितला नाही. आज जे काम सुरू आहे त्याचं श्रेय खोटं घेत आहेत. विकास कामांवर आपला झेंडा लावण्याचा प्रयत्न म्हणजे केवळ नाटकबाजी आहे.

फोटो काढून श्रेय

विजय अग्रवाल यांनी सडेतोड शब्दात आमदार पठाण यांच्यावर हल्लाबोल करत सांगितले की, अकोल्याच्या विकासात भाजपाचे योगदान सातत्याने राहिले आहे. गोवर्धन शर्मा, संजय धोत्रे, भाऊसाहेब फुंडकर आणि रणधीर सावरकर या नेत्यांनी या भागाचा खऱ्या अर्थाने विकास केला. आज डाबकी रोडवर जे काम सुरू आहे, ते पाच महिने सुरू असून त्याचं उद्घाटन करण्याचा, फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे.

Akola Politics : शिवसेनेच्या संघटन रचनेत चतुष्कोणीय किल्ला 

अग्रवाल यांचा सवाल रोखठोक होता. गेल्या पाच महिन्यांपासून डाबकी रोडचं काम सुरू आहे, तेव्हा आमदार पठाण कुठे होते? कोर्टाने निवडणुकीचे आदेश दिले अन् एकदम जागे होऊन हे श्रेय घेण्याचं राजकारण सुरू झालंय. त्यांनी यावर ताशेरे ओढले की, केवळ उद्घाटन करणे म्हणजे विकास नाही. निधी मिळवण्यासाठी शासन दरबारी जे प्रयत्न करावे लागतात, ते भाजप नेत्यांनी सातत्याने केले आहेत, साजिद खान यांनी नाही.

जनता भाजपसोबत

जुन्या शहरात भाजपचा भक्कम गड असल्याचे नमूद करत विजय अग्रवाल म्हणाले की, या भागातील नागरिकांनी 35 वर्षांपासून भाजपावर विश्वास टाकलेला आहे. संकटकाळात देखील या भागाने भाजपला साथ दिली आहे. नगरसेवक सतीश ढगे, विलास शेळके, दिवंगत गणेश ढगे यांच्यासारख्या नेत्यांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. या पार्श्वभूमीवर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केलं की, महायुतीचे कार्यकर्ते केवळ विकासकामासाठी मैदानात उतरतात, श्रेयासाठी नाही. पण कोणी काम न करता स्वतःचं नाव लावायला बघत असेल, तर जनता तेही ओळखते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं अकोल्यात राजकारणाचा रंग गडद होत आहे. श्रेयवाद, आरोप, प्रत्यारोप यांच्या फैरी झडत असून, जनता मात्र शांतपणे सगळं पाहत आहे. अकोल्यातल्या सुजाण नागरिकांना माहिती आहे कोण विकास करतो आणि कोण केवळ चमकण्यासाठी येतो. आगामी निवडणुकीत हेच प्रश्न ठरणार निर्णायक.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!