महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर संतापाचा कडाडा

Rape Case : स्वारगेट प्रकरणावरून महायुती सरकार अडचणीत

Author

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार संतापले आहेत.

स्वारगेट बसस्थानक परिसरात घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणात पीडित मुलीवरच दोषारोप ठेवणाऱ्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याने अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेवर भाष्य करताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी या घटनेत कोणताही संघर्ष किंवा फोर्सफुल कृती झाली नाही, तसेच पीडित मुलीने विरोध केला नाही, असे धक्कादायक विधान केले. यावरून विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत सरकारला सवाल केला आहे की, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुती सरकारचे नाते काय आहे? आरोपीला वाचवण्यासाठी सरकारचे मंत्री पीडित मुलीवरच आरोप का करत आहेत?

Congress Politics : महायुतीला विरोधकांचा ‘खो’

क्लिनचीट देण्यासाठी धडपड?

विजय वडेट्टीवार यांनी पुढे आरोप केला की, अजून आरोपीला शिक्षा मिळायची बाकी आहे. असे असताना सरकारमधील मंत्रीच आरोपीला क्लिनचीट देण्याची घाई का करत आहेत? हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा असून, महिलांच्या सुरक्षेचा बडेजाव मिरवणाऱ्या महायुती सरकारचे हे खरे रूप आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांनी थेट सवाल केला की, “राज्यात महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारने पाऊले उचलायची आहेत. मात्र, येथे पीडित मुलीवरच आरोप करून आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या धडपडीमुळे महिलांना सुरक्षिततेचा आधार मिळेल का?

महिलांसाठी अपमानास्पद

महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली मोठमोठी वक्तव्ये करणारे मुख्यमंत्री आणि मंत्री आता आरोपीला वाचवण्यासाठीच पुढे सरसावले आहेत. आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्यामुळेच हा सगळा प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पीडित मुलीने विरोध केला नाही म्हणून आरोपीने बलात्कार केला, असे विधान करत मंत्र्यांनी पीडितेवरच जबाबदारी टाकली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि महिलांचा अपमान करणारा आहे, असे मत महिला संघटनांनी व्यक्त केले आहे.

लाज बाळगावी

माहिती सरकारवर ताशेरे ओढत वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. महायुती सरकार आरोपींच्या बाजूने उभे राहत आहे. महिलांनी विरोध केला नाही म्हणून गुन्हा घडला, असे बेजबाबदार विधान करताना मंत्र्यांनी थोडी तरी लाज बाळगायला हवी. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

महायुती सरकारकडून पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी आरोपीचे समर्थन केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, त्यामुळेच आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भूमिका स्पष्ट करावी

या प्रकरणात सरकारने कोणत्याही प्रकारे आरोपीला पाठिशी घालू नये. गृह राज्यमंत्र्यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही लढा देत राहू. सरकारने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

ही संपूर्ण घटना राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. सरकारने या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरांवरून केली जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!