
चंद्रपुरातील आकाशवाणी मार्गात येणाऱ्या नाल्या जवळील पूर संरक्षण भिंतीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सरकारवर ताशेरे ओढले.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा 3 जुलै रोजी तिसरा दिवस. सभागृहात वातावरण दमट नव्हते, पण राजकारण मात्र तापलेले होते. एरवी मोठ-मोठ्या नाल्याच्या पाण्याने घरे वाहून जातात. पण आज एका नाल्याच्या बाजूला बांधलेल्या भिंतीने विधानसभेच्या भिंती हलवल्या. विषय होता चंद्रपूरच्या आकाशवाणी मार्गावरील पूर संरक्षण भिंतीचा. पण हा काही केवळ भिंतीचा विषय नव्हता, हा होता लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर बोट ठेवणारा प्रश्न.
विधानसभेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला कात्रीत पकडत संतप्त सवालांची सरबत्तीच केली. ही भिंत लोकवस्तीला वाचवण्यासाठी बांधली का, की एका श्रीमंताच्या बंगल्याला कवच देण्यासाठी? असा थेट प्रश्न करून त्यांनी सरकारला जाब विचारला.

वडेट्टीवारांचे थेट आरोप
वडेट्टीवार म्हणाले, जिथं लोक राहतात, तिथं संरक्षण हवं की जिथं श्रीमंतांची बंगले आहेत तिथं?” त्यांनी याप्रकरणी सभागृहात आक्रमक भूमिका घेत फोटो, कागदपत्रं आणि ठोस माहिती मागवली. त्यांनी आरोप केला की, ही भिंत ज्या बाजूने बांधण्यात आली आहे, ती लोकवस्तीपासून विरुद्ध बाजूने असून त्या ठिकाणी केवळ दोन श्रीमंतांचे घरे आहेत. वडेट्टीवारांचा थेट आरोप होता की, हा 98 लाखांचा खर्च केवळ एका व्यक्तीच्या फायद्यासाठी करण्यात आला. त्यांनी सांगितले की ही भिंत लोकांसाठी नसून केवळ एका भूखंडाच्या ‘ले-आउट’ला वाचवण्यासाठी उभी करण्यात आली.
नैसर्गिक प्रवाहाची रुंदी
विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले की, ज्यांनी ही डिझाईन केली, जागा निवडली, त्यांनी नाल्याची रचना पाहिली नव्हती का? इतक्या मोठ्या शहरातील नाल्याचा फक्त एक टोकाचा भाग भिंतीने झाकला गेला आणि तो ही तिथंच जिथं त्या श्रीमंतांची मालकीची जागा आहे. यावरून स्पष्ट होते की, ही योजना लोकांसाठी नव्हतीच. वडेट्टीवार यांनी असा इशारा दिला की, या भिंतीमुळे नाल्याची जागा कमी झाली असून भविष्यात पुराच्या धोक्याला आमंत्रण मिळू शकते. नाल्याच्या मूळ रुंदीचा अहवाल मागवून त्यांनी शासनाला विचारले की, ज्या जागेची नैसर्गिक प्रवाहाची रुंदी आहे, ती अजून शिल्लक राहील का? की तीही खाल्ली गेली आहे?
Parinay Fuke : सरकारी नियमांच्या जाळ्यात अडकलेला संघर्ष अखेर यशस्वी
जनतेसाठी संकट?
या प्रकरणाला विजय वडेट्टीवार यांनी भ्रष्टाचाराचा वास असल्याचे सुचवत सांगितले की, भविष्यात त्या जागेचा मोठा व्यावसायिक फायदा होणार आहे, म्हणूनच ही भिंत बांधली गेली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत, सरकारला कटघात केलं. सभागृहात त्यांनी विचारले, चुकीचं बांधकाम, चुकीची साईड आणि चुकीचा हेतू, यामागे कोण? तसेच, या सगळ्याचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल का, याचा ठोस जाब मागितला.