
जम्मू कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने राज्यभरात भडका उठवला. वक्तव्यानंतर राज्यभरातून वडेट्टीवार यांच्यावर संतापाची लाट उसळली. त्यानंतर आता वडेट्टीवार यांनी माध्यमांवर आरोप करत माफी मागितली आहे.
पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘आतंकवादी हल्ला करताना धर्म विचारतात का?’ या त्यांच्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. वाढत्या विरोधानंतर वडेट्टीवार यांनी अखेर आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असून याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.

वडेट्टीवार यांनी माध्यमांवर आरोप करत म्हटले की, त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. माझे वक्तव्य मुद्दाम तोडून-मोडून दाखवले गेले. अर्धवट दाखवलेल्या क्लिपच्या आधारे देशात चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठराविक माध्यमांकडून होत आहे. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार रचला जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनःपूर्वक माफी मागतो. मात्र माझ्या पूर्ण भाषणाचा संदर्भ घेऊनच बातमी दाखवावी, असे माझे माध्यमांना विनम्र आवाहन आहे. अर्धवट गोष्टी दाखवून संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न थांबवावेत.
धर्म संभ्रम
विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम येथील हल्ल्यावर बोलताना स्पष्ट मत मांडले की, अतिरेक्यांनी पहिल्यांदा धर्म विचारला आहे, असे काही पर्यटक सांगतात, तर काहींच्या मते तसे काही झालेच नाही. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अतिरेक्यांना एवढा वेळ मिळून त्यांनी पर्यटकांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. यावरून त्यांना कोणीतरी सुचवले व पाठवले असावे असा संशय निर्माण होतो. पुढे बोलताना त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला. पाकिस्तानचा मुख्य हेतू देशातील दोन धर्मांमध्ये भांडण लावून भारताला कमजोर करणे आहे. हा प्रयत्न हल्ल्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आला आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.
विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. कल्याण मृत्युमुखी गेलेल्या नागरिकांच्या परिवारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम विजयी वडेट्टीवार करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर भाजपनेते नितेश राणे यांनीही वडेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. वडेट्टीवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असेही राहणे म्हणाले. मात्र, वडेट्टीवार यांनी केलेले स्पष्टीकरण आणि माफी यामुळे समाज माध्यमांवरील वाद काही प्रमाणात शमण्याची शक्यता आहे.