
राज्यात मराठी भाषेवरून वाद चांगलाच पेटला आहे. अशात आता एका भोजपुरी कलाकाराच्या विधानानंतर या वादात ज्वाला उसळली आणि काँग्रेस नेत्यांनी थेट इशाराच दिला.
महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी असताना, भाजपचे खासदार आणि भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ याने एका वादग्रस्त वक्तव्याने आगीत तेल ओतल्यासारखा प्रकार घडवला आहे. मी मराठी बोलत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा, असे शब्द उच्चारत यादव यांनी मराठी जनतेच्या भावना दुखावल्या. या विधानाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आक्रमक शैलीत निरहुआला खडेबोल सुनावले आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, दिनेश यादव हा कलाकार असला तरी महाराष्ट्राच्या जमिनीवर उभा राहूनच मोठा झाला आहे. त्याच महाराष्ट्रातील मातृभाषेचा अपमान करणे ही केवळ मुजोरी नव्हे, तर बुद्धीची दिवाळखोरी आहे. तू जर इतकाच शूर आहेस, तर महाराष्ट्रात येऊन उभा रहा, मग तुला तुझ्या भोजपुरीची जागा कळेल, अशा शब्दांत त्यांनी भाजप खासदाराला फटकारले.

एकत्र हुंकार
कालच राजकारणातील ऐतिहासिक क्षण घडला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 18 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले आणि दोघांनीही एकजुटीने मराठीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली. मुंबईत येणाऱ्यांनी मराठीत बोलायलाच हवे, अन्यथा दादागिरी करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रमुख नेते अनुपस्थित असले तरी, विजय वडेट्टीवार यांचा आक्रमक सूर ही ठाकरे बंधूंच्या भूमिकेला मिळालेली मोठी बळकटी मानली जात आहे.
वडेट्टीवारांनी यावेळी केवळ निरहुआवरच नव्हे, तर भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही कडाडून हल्लाबोल केला. दोन भाऊ एकत्र आले की, भाजपच्या गोटात हादराचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळेच शेलार यांना पहलगाम आठवतोय. तुम्ही पाकिस्तानात 100 अतिरेकी मारल्याचा दावा करता, पण अजूनही पहलगामचे चार दहशतवादी मोकाट आहेत. पुलवामाला आरडीएक्स कसं आलं? याचे उत्तर न देता लोकांना मूर्ख बनवायचा प्रयत्न करणार? आता जनता सावध झाली आहे. अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर सडकून टीका केली.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी उलगडला महाराष्ट्राच्या मातीतील इतिहास
वादग्रस्त वक्तव्य
मीरा रोडमध्ये एका फास्ट फूड विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी मराठीत बोलण्यास सांगितले होते. यानंतर प्रतिक्रिया देताना निरहुआ म्हणाला होता, मी मराठी बोलत नाही. मी भोजपुरी बोलतो. दम असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, हे वाक्य केवळ एक विधान नव्हतं, तर मराठी माणसाच्या अस्मितेवर सरळ आघात होता, अशी संतप्त प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षांतून उमटू लागली आहे.
दरम्यान, मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे सुशील केडिया. मात्र त्यांनी आता यावर माघार घेत, एक व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. मी तणावाखाली असताना ते ट्विट केलं. त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोक वाद निर्माण करून फायदा मिळवू पाहात होते. मला आता जाणवतंय की माझी ती प्रतिक्रिया मागे घेणं गरजेचं होतं. असं त्यांनी म्हटलं आहे.
राजकारणात सध्या मराठी भाषेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की, भाषा ही केवळ संभाषणाचं साधन नाही, ती समाजाच्या संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचं प्रतिनिधित्व करते. अशा भाषेचा अवमान करणाऱ्यांना केवळ शब्दांनी नव्हे तर राजकीय, सामाजिक आणि वैचारिक पातळीवरही उत्तर देण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे.