महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : शेतकरी फासावर अन् कृषीमंत्री पत्त्यांच्या डावावर

Rummy Circle : खत, बियाणं हरवलं आणि कोकाटेंनी रमी सर्कलचं पान उचललं 

Post View : 30

Author

एकीकडे विदर्भाच्या मातीत दररोज नांगर रेटणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातून आर्त हंबरडा उठतोय, तर दुसरीकडे मंत्रिपदाच्या एसी खोल्यांमध्ये ‘रम्मी’ खेळून सत्तेची मस्ती साजरी केली जातेय. हो, वाचताय ते खरं आहे. ‘शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय’, अशा शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जळजळीत बोट ठेवलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भाषेत सरकारची कानउघाडणी करताना स्पष्ट सांगितलं की, आज महाराष्ट्रात रोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जाच्या वजनाने दबून, विम्याच्या नव्या क्रूर अटींमध्ये गळा अडकून, पीक बुडाल्यानंतरही सरकारच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांचा अखेरचा कोंडमारा सुरू आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाचा मंत्री रम्मी खेळत बसलेला आहे. हा दुटप्पीपणा आणि बेफिकिरी महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट अक्षरांनी कोरली जाईल, असा संतप्त उद्गार त्यांनी काढला.

नावापुरतं मंत्रीपद 

वडेट्टीवारांनी कोकाटेंवर केलेल्या टीकेचा आणखी एक धगधगता मुद्दा म्हणजे मंत्रिपदाचा देखावा. भाजपने फक्त नावापुरतं मंत्रीपद दिलं आहे, कोकाटेंना प्रत्यक्षात कुठलाही अधिकारच नाही. मग ना निर्णय घेण्याची शक्ती, ना काही बदल करण्याची तळमळ. म्हणूनच ते उरलेल्या वेळात रम्मी खेळतात. असा उपरोधिक टोला वडेट्टीवारांनी लगावला. हेच का आपलं महाराष्ट्र? असा सवालही त्यांनी विचारत जनतेला विचारमग्न केलं.

सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांची मानसिकता उघड करत वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. गुंडांसोबत फिरणारे आमदार, बेछूट वादग्रस्त मंत्री आणि शेतकऱ्यांची परवाच नसलेले निर्णय घेणारी सत्ता, हे सरकार म्हणजे विश्वासघाताचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी पुढे असा सवाल केला की, “शेतकरी हा या राज्याचा कणा आहे, त्याच्या आत्महत्या थांबवण्याऐवजी, त्याच्याच डोक्यावर जबाबदाऱ्या टाकणं हे कोणत्या धोरणाचा भाग आहे?

तात्काळ निर्णय घ्यावा

जर कृषीमंत्री शेतकऱ्यांबद्दल जबाबदारी घेण्यास असमर्थ असतील, तर त्यांना त्या खुर्चीवर ठेवणं हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. यापूर्वीही कोकाटेंनी केलेल्या विवादग्रस्त विधानांची आठवण करून देत, वडेट्टीवारांनी असा इशारा दिला की, जर हे सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत राहिलं, तर जनता त्यांना निवडणुकीच्या पत्त्यांच्या डावातच चितपट करेल.

ही सत्ता जनतेच्या दुःखाशी फारकत घेत फक्त सत्तेच्या चैनात रमलेली आहे, असा आरोप करत वडेट्टीवारांनी राज्यकर्त्यांच्या संवेदनशून्यतेवर थेट आघात केला. “हे सरकार पुन्हा कधी महाराष्ट्रात येणार नाही, असा जाहीर निर्वाळाही त्यांनी दिला. राज्याचं शेतकी चित्र दिवसेंदिवस भयावह होत चाललेलं असताना, रम्मीच्या पत्त्यांवर सत्ता चालवणं हा शुद्ध उन्मादच. वडेट्टीवारांचा सूर असो की, शेतकऱ्याच्या मरणाचं दुःख, एक गोष्ट स्पष्ट आहे.. आता जनतेनेही आपल्या पत्त्यांचा डाव मांडायला हवा.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!